मुंबई : कॉमन विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूटीई – यूजी) २०२५ प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) सीयूटीई यूजीसाठी असलेल्या विषयांची संख्या ६३ वरून ३७ पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये भाषा व विशिष्ट विषयांची संख्या कमी करण्यात आली आहे. ही परीक्षा ८ मे ते १ जून २०२५ या कालावधीत हाेणार आहे.
देशातील सर्व विद्यापीठांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनटीएकडून सीयूटीई यूजी २०२५ परीक्षा घेण्यात येते. देशातील २८५ शहरांमध्ये होणारी ही परीक्षा ८ मे ते १ जून २०२५ दरम्यान होणार आहे. ही परीक्षा देशातील २६० हून अधिक विद्यापीठांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. या परीक्षेसाठी १ ते २२ मार्चदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने परीक्षेचा आढावा घेतल्यानंतर काही बदल सुचवले आहेत. त्यानुसार यंदा घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यातील महत्त्वपूर्ण बदल म्हणजे विषयांची संख्या ६३ वरून ३७ इतकी करण्यात आली आहे. कमी करण्यात आलेल्या विषयांमध्ये भाषा व विशिष्ट विषयांचा समावेश आहे. पूर्वी परीक्षेमध्ये ३३ भाषांचा समावेश होता. त्याऐवजी आता १३ भाषा असणार आहेत. त्याचप्रमाणे २९ विशिष्ट विषय होते. त्यांची संख्या २३ करण्यात आली आहे. तसेच एक सामान्य अभियोग्यता चाचणीचा समावेश आहे. परीक्षेतून जे विषय कमी करण्यात आले त्यांचे प्रवेश सामान्य पात्रता परीक्षेच्या गुणांवर आधारित असणार आहेत. सीयूटीई ही इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा १३ भारतीय भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.
परीक्षेत करण्यात आलेले अन्य बदल
– कोणत्याही विषयाची परीक्षा उमेदवाराला देता येणार
– सीयूटीई यूजी २०२५ मध्ये जास्तीत जास्त पाच विषय निवडण्याची परवानगी आहे. यापूर्वी त्यांना सहा विषय निवडता येत होते.
– विद्यार्थी बारावीमध्ये न शिकलेले विषय निवडू शकतात.
– सीयूटीई यूजी २०२५ पूर्णपणे संगणक आधारित असणार.
– परीक्षा केंद्रांची संख्या भारतात ३५४ वरून २८५ आणि परदेशात २६ वरून १५ पर्यंत कमी केली. गतवर्षी ही परीक्षा परदेशातील २६ शहरांमध्ये झाली होती.
– सर्व परीक्षांसाठी ६० मिनिटांचा समान कालावधी निर्धारित करण्यात आला असून पूर्वी हा कालावधी ४५ मिनिटांपासून ६० मिनिटांपर्यंत होता.
– सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. पर्यायी प्रश्नांची पद्धत रद्द.