मुंबई : आर्थिक गर्तेत अडकलेल्या आणि टाळेबंदी काळात आर्थिक गणिते बिघडलेल्या एसटी महामंडळाला मालवाहतुकीमुळे नवसंजीवनी मिळाली. एसटी महामंडळाने ‘महाकार्गो’ या नावाने मालवाहतूक सुरू करून, आर्थिक तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक मालवाहतुकीच्या गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाल्याने त्या आता भंगारात काढण्यात आल्या आहेत. परिणामी, मालगाड्याची संख्या घटल्याने त्यातून मिळणारा महसूलही कमी झाला आहे.
राज्य सरकारने १८ मे २०२० रोजी काढलेल्या आद्यादेशानुसार एसटी महामंडळ बसमधून व्यावसायिक स्वरूपात माल वाहतूक करू शकते. त्यासाठी आवश्यकता असल्यास जुन्या एसटी बसमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांचे रूपांतर मालवाहू वाहनांत करून त्याद्वारे ही मालवाहतूक सुरू केली. राज्यातील ३१ विभागांमध्ये १० वर्षांचे आयुर्मान झालेल्या आणि ६.५० लाख किमी धावलेल्या बसचे रूपांतर मालवाहतुकीमध्ये करण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले होते. त्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या काळात रत्नागिरी येथून आंब्यांच्या पेट्या बोरिवलीला पाठवण्यात आला. त्यानंतर एसटीच्या ‘महाकार्गो’ मालवाहतुकीला वेग आला. करोना काळात एसटीची प्रवासी सेवा बंद असताना, मालवाहतूक सुरू होती. त्यानंतर या सेवेला लघु-मध्यम उद्योजकांसह मोठे उद्योजक प्रतिसाद देऊ लागले.
हेही वाचा >>>“मनुस्मृतीला महाराष्ट्रात स्थान नाही”, विरोधकांच्या पत्राला अजित पवारांचं प्रत्त्युतर; म्हणाले, “असं राजकारण करणं…”
त्यानंतर राज्याच्या विविध भागातून पाण्याच्या बाटल्या, अन्नधान्य, बि-बियाणे, खते, भाजीपाला, साखर, कृषी उत्पादने यासोबत लोखंडी पाईप, रंगाचे डबे, सिमेंट, पुस्तके अशा विविध प्रकारच्या मालाची वाहतूक मालवाहू एसटीमधून केली. यासाठी साधारण १ हजार ८०० मालवाहतूक गाड्या कार्यरत होत्या. तर, गेल्या वर्षी ही संख्या १ हजार १०० वर येऊन पोहचली. त्यानंतर सध्या ६५० मालवाहतूक गाड्या उपलब्ध आहेत. तसेच डिसेंबर २०२४ पर्यंत आणखीन ७५ मालवाहतूक गाड्यांची आयुर्मान पूर्ण होणार असून भंगारात निघणार आहेत. नवीन मालवाहतूक वाहने तयार केली जात नसल्याने, पुढील वर्षी ५७५ मालवाहतूक गाड्या शिल्लक राहतील. त्यामुळे एसटीच्या महाकार्गोसारखी सेवा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.