मुंबई : कौटुंबिक वाद, कामाचा ताण, आर्थिक अडचण, आजारपण, नैराश्य, प्रेमभंग या कारणामुळे अनेकजण आत्महत्येचा पर्याय निवडतात आणि रेल्वेचे रुळ जवळ करतात. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दररोज सरासरी तीन ते चार आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ५१ जणांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यात ४७ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे.
मध्यमवयीन व्यक्ती आणि त्यांच्या मुलाने पश्चिम रेल्वे मार्गावर वेगाने धावणाऱ्या गाडीखाली झोपून आत्महत्या केल्याच्या समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या चित्रफितीमुळे अनेकांच्या अंगावर काटा आला. रेल्वे मार्गावर झोपून, धावत्या गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे वाढते प्रमाण हे रेल्वे प्रशासनासाठीही चिंताजनक ठरले आहे. जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवर ३४ आत्महत्या झाल्या. यात ३१ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश आहे. तर, याच कालावधीत पश्चिम रेल्वेवर १७ आत्महत्या झाल्या. यात १६ पुरूष आणि १ महिलेचा सहभाग आहे. मध्य रेल्वेवर सर्वाधिक आत्महत्या कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या असून २० आत्महत्येची प्रकरणे आहेत. तर, पश्चिम रेल्वेवर पालघर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या असून १२ आत्महत्येच्या घटनांची नोंद झाली आहे.
हेही वाचा >>>मुंबईत पुन्हा हिट अँन्ड रन; मुलुंडमध्ये ऑडी कारची दोन रिक्षांना धडक, एकाची प्रकृती गंभीर
आत्महत्येमुळे रेल्वेचा कारभार विस्कळीत
लोकल खोळंबा होण्यामागे अनेक तांत्रिक बिघाड असतात. मात्र, अनेकवेळा कोणताही कोणताही तांत्रिक बिघाड, अपघात झाला नसताना देखील लोकल उशिराने धावत असते. लेटलतीफ कारभारामागे आत्महत्या करणाऱ्या घटना हे एक कारण आहे. धावत्या रेल्वेसमोर उडी घेणे, ओव्हरहेड वायरला स्पर्श करणे, धावती रेल्वे पाहून रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याच्या घटना घडतात. या घटनांचा फटका लोकल सेवेला बसतो. तणावग्रस्त व्यक्ती आत्महत्येसाठी धावत्या लोकल समोर उडी घेण्याचा पर्याय निवडतात. आत्महत्या केल्यानंतर संबंधित घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाला कळायला, कामगारांद्वारे तेथील मृतदेह उचलण्यात बराच अवधी जातो. त्यामुळे आत्महत्येच्या एका घटनेने त्या दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल विलंबाने पोहचतात. शेवटच्या स्थानकात या लोकल उशिरा पोहचण्यास, तेथून पुन्हा दुसऱ्या स्थळी जाण्यास लोकलला उशीर होतो. त्यामुळे आत्महत्येच्या प्रकरणामुळे रेल्वेचा कारभार विस्कळीत होतो.
१ जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ५१ आत्महत्येची प्रकरणे नोंदवण्यात आली. यात पुरूष ४७ आणि ४ महिलांचा सहभाग आहे. तसेच मध्य रेल्वेवर ३४ आत्महत्या (३१ पुरुष आणि ३ महिला), पश्चिम रेल्वेवर १७ आत्महत्या (१६ पुरुष आणि १ महिला)
१ जानेवारी ते ३० जून २०२३ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ५० आत्महत्येची प्रकरणे नोंदवण्यात आली. यात ४१ पुरूष आणि ९ महिलांचा सहभाग आहे. तसेच मध्य रेल्वेवर ३३ आत्महत्या (२७ पुरुष आणि ६ महिला), पश्चिम रेल्वेवर १७ आत्महत्या (१४ पुरुष आणि ३ महिला)
कल्याण, पालघरमध्ये सर्वाधिक आत्महत्या
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सर्व पोलीस हद्दीमध्ये कल्याण आणि पालघरमध्ये सर्वाधिक आत्महत्यांची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. जानेवारी ते जून २०२३ मध्ये कल्याणमध्ये १४ आणि पालघरमध्ये ८ आत्महत्येच्या प्रकरणाची नोंद आहे. तर, याच कालावधीत यावर्षी कल्याणमध्ये २० आणि पालघरमध्ये १२ आत्महत्येच्या प्रकरणाची नोंद आहे. त्यामुळे यावर्षी कल्याण, पालघर पोलीस हद्दीत आत्महत्या वाढल्या आहेत.