भाडेतत्त्वावरील मिनी बस सेवा आणि आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न देणाऱ्या एमपी ग्रुप कंपनीला बेस्ट उपक्रमाने नोटीस बजावली आहे. ‘कंत्राट रद्द का करू नये’ अशा आशयाची नोटीस बजावून एक महिना लोटला तरीही कंत्राटदार कंपनीने त्याचे उत्तर सादर केलेले नाही. बेस्ट उपक्रमान कंत्राटदाराच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, त्यामुळे बेस्ट बस गाड्यांची संख्या रोडावण्याची शक्यता आहे. या कंत्राटदाराच्या २८० पैकी तब्बल २७० मिनी बस सध्या सेवेत नाहीत. परिणामी, बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या रोडावली असून त्याचा प्रवासी सेवेवर परिणाम होऊ लागला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश आहेत. एमपी ग्रुप कंपनीच्या २८० मिनी वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात होत्या. बस बिघडणे, वातानुकूलित यंत्रणा योग्य नसणे अशा तक्रारी बेस्ट उपक्रमाकडे सातत्याने येत होत्या. शिवाय या बसवर कंपनीने कंत्राटी चालक तसेच देखभालीसाठी यांत्रिकी कर्मचारी नियुक्त केले होते. वेतन आणि अन्य थकबाकीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटदाराचे कर्मचारी वारंवार काम बंद आंदोलन करीत होते. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे बेस्टने दंडात्मक कारवाई करण्यासाठी कंपनीवर वारंवार नोटीस बजावली होती. या नोटीसनाही योग्य उत्तर मिळत नसल्याने अखेर बेस्टने एक महिन्यापूर्वी कंत्राट रद्द करण्याबाबतची नोटीस या कंपनीला पाठविली होती. त्याचेही उत्तर अद्याप बेस्टला पाठविण्यात आलेले नाही.
हेही वाचा- घाटकोपरच्या मैदानात ऐतिहासिक तोफांचे जतन; मुंबईकरांना आठ फूट लांब तोफा पाहता येणार
यासंदर्भात कंत्राट रद्द करण्याची नोटीस एमपी ग्रुप कंपनीवर बजावण्यात आली आहे. मात्र कंपनीने अद्याप उत्तर सादर केलेले नाही. कंपनीच्या उत्तराची प्रतीक्षा करीत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. सध्या या ग्रुपच्या २८० पैकी २७० मिनी बसही बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. मिनी बसमुळे प्रवासी वाहून नेण्याचा संख्येवरही मर्यादा येतात. त्याऐवजी मोठ्या आकाराच्या बस ताफ्यात दाखल केल्या जात असल्या तरीही त्यांचे प्रमाण कमी आहे.