मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महिला, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांची काहीशी गैरसोय होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता मेट्रो गाड्यांमध्ये या घटकांसाठी अतिरिक्त आरक्षित आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका पूर्णत: सेवेत दाखल होऊन एक वर्षे लोटले. या मार्गिका पूर्णत सेवेत दाखल झाल्यानंतर ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या मार्गिकांना प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळत आहे, प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय आहेत, प्रवाशांच्या समस्या वा सूचना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकतीच मेट्रो सफर केली. यावेळी त्यांनी प्रवाशांबरोबर संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत सर्वांशी त्यांना संवाद साधला. यावेळी प्रवाशांनी मेट्रो प्रवासाबाबत समाधान व्यक्त केले, पण त्याच वेळी काही सूचनाही केल्या.
हेही वाचा – चालायला पदपथ आहेतच कुठे? बेकायदा फेरीवाल्यांवरील कारवाईवरून उच्च न्यायालयाचा प्रश्न
या सूचनांनुसार एमएमआरडीएने मेट्रो गाड्यांमध्ये ज्येष्ठ, महिला – गर्भवती महिला यांच्यासाठी अतिरिक्त आरक्षित आसने ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सहा डब्ब्यांच्या मेट्रो गाडीत महिलांसाठी एक डब्बा आरक्षित आहे. तर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासाठीही काही आसने आरक्षित आहेत. मात्र गर्दीच्या वेळी ही आरक्षित आसने अपुरी पडतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, महिलांना प्रवासात त्रास सहन करावा लागतो, दाटीवाटीत प्रवास करावा लागतो. पण आता मात्र या घटकांसाठीच्या आरक्षित आसनांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.