मुंबई: हल्ली व्हेरिकोज व्हेन्सची समस्या वाढत असून यात रुग्णांना पाय दुखणे, जडपणा येणे व पायाच्या शिरा फुगलेल्या दिसून येतात. बैठी जीवनशैली, तासनतास एकाच स्थिती बसुन करावे लागणारे काम, सतत उभे रहावे लागणे, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, गर्भधारणा आणि जागरूकतेचा अभाव ही व्हेरिकोज व्हेन्सची प्रमुख कारणे ठरत आहेत.

जर वेळीच उपचार केले नाहीत तर ते अल्सर किंवा शिरा फुटण्सासारख्या गंभीर गुंतागुंत निर्माण करु शकतात. व्हेरिकोज व्हेन्सवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. एंडोव्हेनस लेसर थेरपी सारख्या आधुनिक आणि मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्रांचा वापर करून प्रभावी उपचार करता येतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. खाजगी रुग्णालयात या आजारावरील उपचासाठी दीड लाखांपर्यंत खर्च येत असून मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात यासाठी अवघे दहा हजार रुपये आकारले जातात.

इंग्लंडमधील ५२ वर्षीय शिक्षिका रूथ स्कॉलिंग यांना पाच ते सहा महिन्यांपासून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सतावत होता. त्यांची प्रकृती इतकी गंभीर झाली होती की त्यांना चालणे किंवा उभे राहणे देखील शक्य होत नव्हते. ती गेल्या इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सिस्टीमअंतर्गत उपचार घेण्यासाठी वाट पाहत होती. अखेर ती उपचार घेण्यासाठी भारतात आली.

कलर डॉपलर चाचणीत दुहेरी व्हेरिकोज व्हेन्सचे निदान झाले. एंडोव्हस्कुलर लेसर ट्रीटमेंट ही एक दुर्बींणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये लेसर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही प्रक्रिया खराब झालेल्या शिरा बंद करून निरोगी शिरांमधून रक्तप्रवाह सुरळीत करते. ही शस्त्रक्रिया भूल देऊन केली जाते तसेच रुग्ण कमीत कमी कालावधीत सामान्यपणे काम करू शकतो. रुथवर याप्रकारची प्रक्रिया केल्यामुळे आता ती वेदनामुक्त आयुष्य जगु लागल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या एंडोव्हस्कुलर सर्जन डॉ. अशांक बन्सल यांनी सांगितले.

व्हेरिकोज वेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये रक्त एकाच ठिकाणी जमा होते. यामुळे आपल्या शिरा फुगतात आणि पायात प्रचंड वेदना निर्माण होते. दीर्घकाळ उभे राहिल्याने किंवा चालण्यामुळे पायांवर ताण येतो. दीर्घकाळ उभे राहणे, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोनल बदल, गर्भधारणा आणि वय हे व्हेरिकोज वेन्सला कारणीभूत घटक आहेत. व्हेरिकोज वेन्सच्या लक्षणांमध्ये सहसा वेदना होणे, स्नायुंमधील जडपणा, सूज आणि फुगलेल्या शिरा अशी लक्षणे दिसून येतात. जर वेळीच उपचार न केले तर त्यामुळे पायात अल्सर, संसर्ग, त्वचेचा रंग बदलणे किंवा अगदी शिरा फुटण्यासारखी गुंतागुंत होऊ शकतात. आमच्या क्लिनिकमध्ये, आम्ही दर आठवड्याला अशा सुमारे ३०-४० रुग्णांवर उपचार करतो असे एंडोव्हस्कुलर सर्जन डॉ. अशांक बन्सल यांनी सांगितले.

तिशीतील तरुणांमध्ये ही समस्या वाढत असून यामध्ये वेदना, खाज सुटणे, सूज येणे आणि पायातील जडपणा अशा लक्षणे आढळतात. ही स्थिती टाळण्यासाठी, नियमित पायांची हालचाल करा, जास्त वेळ उभे राहणे टाळा, वजन नियंत्रित राखा आणि कॉम्प्रेशन स्टॉकिंग्जचा वापर करा. सध्या इव्हीएलटी सारखे प्रभावी उपचार पर्याय उपलब्ध आहेत. व्हेरिकोज वेन्सची समस्या घेऊन रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पूर्वी १० ते १२ इतकी होती. मात्र आता त्यात तिपटीने वाढ झाली असून ही संख्या जवळजवळ ३०-४० रुग्णांमध्ये आढळते असेही डॉ बन्सल म्हणाले.

भारतामध्ये पंधरा ते वीस टक्के लोकांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास दिसून येतो. काही विशिष्ट समुदायात हे प्रमाण अधिक असते. महिलांमध्ये वेरीकोस वेन्सचा धोका जास्त असून सुमारे २० ते २५ टक्के महिलांमध्ये आणि १० ते १५ टक्के पुरुषांमध्ये हा आजार आढळतो. वयोमानानुसार व्हेरिकोज वेन्स होण्याची शक्यता वाढते. काही अभ्यासानुसार वृद्धापकाळात ७३ टक्के महिलांमध्ये व ५६ टक्के पुरुषांमध्ये ही समस्या उद्भवते असे हितवर्धक मंडळ रुग्णालय कांदिवली येथील डॉ नीता सिंगी यांनी सांगितले. आमच्या रुग्णालयात यावर माफक दरात लेझर शस्त्रक्रिया केली जाते असेही त्यांनी सांगितले.

ज्या कार्यक्षेत्रामधे दिर्घकाळ उभे रहावे लागते, अशा कार्यक्षेत्रामधे काम करणाऱ्या व्यक्तिंमधे हा आजार प्रामुख्याने दिसून येतो यामधे डॉक्टर, पोलीस, ट्रफिक पोलिस, शिक्षक इत्यादींचा समावेश होतो, याव्यतिरिक्त अनुवांशिकतेनेही काही प्रमाणात हा आजार उद्भवतो. यासाठी रुग्णांना जीवन शैलीतील बदल, पायामधे घालायचे घट्ट मोजे, व्यायाम, नियमित चालणे कल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो किंवा त्याच्या वाढीचे प्रमाण नियंत्रित करता येते. परंतु पायाला सूज येणे जी झोपल्यानंतर कमी होते, त्वचा कोरडी होऊन खाज सुटणे छोट्या अखमा होऊन त्या लवकर भरून न येणे तसेच या जखमांमधून पाण्यासारखा द्रव पाझरत रहाणे अशी लक्षणे असतील तर हे रुग्ण सी-४ व सी-६ या विभागात येतात. अशांना व्हेरिकोज व्हेन्सच्या इलाजाची गरज असते. वर सांगितलेल्या लक्षणांची एकाहून अधिक कारणे असली तरी सोनोग्राफी-कलर डॉपलरच्या सहाय्याने या आजाराचे अचूक निदान करणे शक्य आहे.

कलर डॉपलरच्या सहाय्याने पायातील नसा सूजलेल्या आहेत का व असल्यास त्यांचा आकार, पायातील इतर मुख्य नसा बंद तर नाहीत ना तसेच पायातील नसांमधील रक्तप्रवाह प्रवाह उलट दिशेने तर होत नाही ना अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होते. त्यानुसार उपचार प्रणाली निश्चित करता येते, असे मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयातील इंटरव्हेन्शनल रेडीऑलॉजिस्ट व प्राध्यापक डॉ विवेक उकिर्डे यांनी सांगितले.

पूर्वी व्हेरिकोज व्हेन्सच्या इलाजासाठी शस्त्रक्रियाचा एकमेव पर्याय होता. परंतु आता या साठी मिनिमल इव्हेसिव्ह हा पर्याय आहे. हा इलाज करत असताना सोनोग्राफी तंत्राचे योग्य शिक्षण आणि ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. सोनोग्राफी च्या सहाय्याने पायातील सुजलेल्या शिरेमध्ये एका लहान सुईच्या सहाय्याने प्रवेश करून त्या द्वारे एक पातळ लेझर ची नळी या शिरेमध्ये सोडली जाते व लेझरच्या सहाय्याने ही सूजलेली शिर आतूनच बंद केली जाते. त्यामुळे उभे राहील्यानंतर पायाकडे उलट दिशेने येणारा प्रवाह थांबविला जातो व रुग्णाच्या त्रासामधे लक्षणीय बदल दिसून येतो. लेझर शिवाय मायक्रोव्हेव, रेडिओ फ्रिक्वेन्सी तसेच एलयुई सारख्या चिकट द्रव पदार्थाचा वापर करूनही हाच परिणाम साधता येतो असे डॉ विवेक उकिर्डे यांनी सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाने व्हेरिकोज व्हेन्सचा इलाज अतिशय सोपा झाला असला तरी सर्वच पायदुखीचे कारण व्हेरिकोज व्हेन्स असू शकत नाही. यासाठी योग्य प्रकारची कारणमीमांसा सोनोग्राफीच्या सहाय्याने अचूक निदान व योग्य उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास रुणाला निश्चितच पूर्ण आराम मिळतो व हा आजार पुन्हा-पुन्हा उद्भवत नाही. हा उपचार बाह्यरुग्ण सेवेमधे सुद्धा करता येतो. इलाजानंतर रुग्ण स्वतः चालत आपल्या घरी जाऊ शकतो. तसेच उपचारानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच सर्व रूटीन काम करता येतात असे डॉ उकिर्डे म्हणाले. खाजगी रुग्णालयात लेझर शस्त्रक्रियेसाठी लाख ते दीड लाख रुपये खर्च येतो मात्र महापालिका रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी दहा हजार रुपये एवढाच खर्च येतो.