सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपने सुरू केलेल्या प्रचाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही सोशल मीडियाचा आधार घेतला असून, या माध्यमाचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण राज्यातील कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे. मात्र जुन्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा संगणकाशी फारसा संबंध नसल्याने नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना पुढे आणून त्यांना प्रशिक्षित करण्याची वेळ काँग्रेसवर आली.
काँग्रेसनेही सोशल मिडियाचा वापर करण्यावर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भर दिला आहे. त्यानुसार सर्व राज्यातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जात आहे. महाराष्ट्रात सध्या प्रशिक्षण शिबिरे सुरू झाली असून, पुणे आणि ठाण्यातील शिबिरे अलीकडेच पार पडली. आणखी चार विभागीय मुख्यालयांमध्ये ही शिबिरे झाल्यावर जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले जाणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते आणि या शिबिरांचे समन्वयक सचिन सावंत यांनी सांगितले.
सोशल मिडियाबाबत पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह जाणवत नाही. कारण अनेक पदाधिकाऱ्यांचा या मिडियाशी संबंधच आलेला नाही. यामुळेच नव्या पिढीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात येत आहे. नव्या पिढीतील कार्यकर्त्यांमध्ये या मिडियाबाबत उत्साह दिसून येतो. त्यांनाच सोशल मिडियातून पक्षाची बाजू कशी मांडायची या संदर्भात प्रशिक्षित केले जाते. विरोधकांच्या आरोपांना द्यायचे प्रत्युत्तर, पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणे आदींचे प्रशिक्षण दिले जाते. भाजपमध्ये या मिडियाचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. या तुलनेत काँग्रेसमध्ये मात्र तेवढे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय नाहीत. म्हणूनच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना पुढे आणले जात आहे.

Story img Loader