मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (मुंबै बँक) मजूर सहकारी संस्था प्रवर्गातील रिक्त असलेल्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ व मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे मजूर प्रवर्गातून ते बिनविरोध संचालक बनणार, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबै बँकेतील पंचवार्षिक निवडणुकीत प्रवीण दरेकर हे मजूर सहकारी संस्था तसेच नागरी सहकारी बँक प्रवर्गातून निवडून आले होते. मात्र, दरेकर यांनी मजूर सहकारी संस्था प्रवर्गातील संचालकपदाचा ३ जानेवारी २०२२ रोजी राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. राजीनाम्याच्या दिवशीच दरेकर यांना मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी अपात्र ठरविले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते.
या रिक्त जागेसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ४ ऑक्टोबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात नामनिर्देशन पत्र मिळण्यासाठी व दाखल करण्यासाठी दोनच दिवसांची मुदत होती. अधिकृत नामनिर्देशन उमेदवारांची यादी मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये फक्त प्रकाश दरेकर यांचा अर्ज दाखल झाल्याचे दिसते. त्यामुळे मजूर प्रवर्गातून संचालक बनण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला.
प्रकाश दरेकर हे मुंबई भाजपचे उपाध्यक्ष असून, ते माजी नगरसेवक आहेत. मजूर सहकारी संस्था प्रवर्गातून अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित उमेदवार मजूर असणे आवश्यक आहे. दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष कुलकर्णी यांनी पात्र ठरवला आहे. त्याआधी मजूर सहकारी संस्थेतील मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्याला आक्षेप घेण्यात आलेला आहे किंवा नाही, हे समजू शकलेले नाही. त्यामुळे तूर्तास तरी प्रकाश दरेकर हे मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, विभागीय सहनिबंधकांनी मुंबई बँकेचे विद्यमान अध्यक्ष व विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मजूर सहकारी संस्थेचा सदस्य म्हणून अपात्र घोषित केले आहे. तरीही मुंबै बँकेच्या मजूर सहकारी संस्था मतदारसंघातील अंतिम मतदारयादीत अद्यापही प्रवीण दरेकर यांचे नाव असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. याविरोधात आपण विभागीय सहनिबंधक व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी बाजीराव शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. ही मतदार यादी सदोष असल्यामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.