मुंबई: जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम उपचार आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णालय प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीकोनातून नुकतेच रुग्णालयामध्ये अत्याधुनिक व अद्ययावत उर शल्यचिकित्सा विभागाचा कक्ष सुरू करण्यात आला. त्याचपार्श्वभूमीवर आता रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह आणि रुग्णकक्ष अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.
जे.जे. रुग्णालयालामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम उपचार मिळावे यासाठी रुग्णालय प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी रुग्णालयातील सुविधा अद्ययावत करण्याकडे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, मुंबई शहराचे पालकमंत्री, शहराचे जिल्हाधिकारी यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच रुग्णालयामध्ये अनेक विभाग अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह आणि चार रुग्ण कक्ष अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा… इन्स्टाग्राम रिल्स बनवणाऱ्या दोन रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई
रुग्णालयातील नाक, कान, घसा विभाग, सुघटनशल्य चिकित्सा विभाग, लहान मुलांचे विभाग आणि शल्यचिकित्सा विभागाचे सुसज्ज शस्त्रक्रियागृह करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच उर शल्यचिकित्सा विभागाप्रमाणे चार रुग्ण कक्ष अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मज्जातंतू शास्त्र विभाग, शल्यचिकित्सा विभाग, हृदयशल्यचिकित्सा विभाग आणि अन्य एका विभागाचे अद्ययावतीकरण करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समितीकडे (डीपीडीसी) पाठविण्यात आला आहे. या दोन्ही प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर जे.जे. रुग्णालयातील मोड्यूलर शस्त्रक्रियागृह आणि अद्ययावत रुग्ण कक्ष उभारण्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.