मुंबई: राज्यातील जनतेच्या विश्वासाला अपात्र ठरलेल्या या सरकारच्या आशीर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. शेतकऱ्यांची या सरकारने घोर फसवणूक केली असून, विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय केला आहे. महायुती सरकारच्या काळात सामाजिक तेढ वाढली असून सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी करत, सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.
या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली आहे. गोळीबाराच्या घटनांत वाढ झाली असून पोलीस ठाण्यात सत्ताधारी भाजपचे आमदार गोळीबार करू लागले आहेत. प्रक्षोभक विधान करून काही लोकप्रतिनिधी राजकीय वातवरण गढूळ करीत आहेत अशी टीका विरोधकांनी केली. गुंडांना पोसण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकार करीत आहे. अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी नेत्यांच्या बैठकीला वडेट्टीवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख, शिवसेनेचे सुनील प्रभू, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील, आमदार भाई जगताप आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>जर्मनीला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य सरकारचा सामंजस्य करार
शेतकऱ्यांची फसवणूक
शेतकऱ्यांची घोर फसवणूक सुरू आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याची माहिती राज्यातील राज्यकर्त्यांकडून दिली जाते. पण केंद्राने बंदी कायम असल्याचे जाहीर केले. यात कांदा उत्पादक शेतकरी भरडले गेले. सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
‘विरोधक गोंधळलेले’
चहापानावर बहिष्कार टाकण्याची विरोधकांची परंपरा कायम असून ते निराश व गोंधळलेले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. केंद्र व राज्य सरकार चांगल्या प्रकारे जनतेसाठी निर्णय घेत असून विकासकामे होत आहेत, ही विरोधकांची खरी पोटदुखी असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. विरोधकांना जनतेच्या प्रश्नांशी देणेघेणे नसून राजकारण करायचे आहे. दुष्काळ, वादळ, अतिवृष्टी अशा विविध संकटांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने गेल्या दीड वर्षात सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारही प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत असून एक रुपयात पीकविमा योजना सुरू आहे. त्याचा हप्ता सरकार भरीत आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.