मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकलमधील एका मालडब्याचे रूपांतर ज्येष्ठ नागरिक डब्यांत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावाला मुंबईच्या डबेवाल्यांच्या संघटनेने विरोध केला आहे. दरम्यान, असे केल्यास लोकलच्या इतर मालडब्यावर याचा ताण येईल. तसेच भविष्यात कोणताही मोठा अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे लोकलच्या मालडब्याचे रूपांतर ज्येष्ठ नागरिक डब्यात करू नये, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेळेच्या अचूक नियोजनामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची ख्याती जगभर पसरली आहे. त्यांच्यामुळे नोकरदार वर्गाला दुपारी वेळेत गरमागरम घरचे जेवण मिळते. दररोज गर्दीतून प्रवास करून प्रत्येकाला अचूक डबे दिले जातात. सध्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये ४ मालडबे आणि १४ डब्यांच्या लोकलमध्ये ५ मालडबे आहेत. त्यातील एक डबा जेष्ठ नागरिकांसाठी आरक्षित करण्याचा पश्चिम – मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे. जर हा एक मालडबा आरक्षित केला, तर इतर मालडब्यांवर ताण येईल. त्यामुळे उर्वरित डब्यांमध्ये धक्काबुक्की, वादविवाद, हाणामारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाने मालडब्याचे ज्येष्ठ नागरिक डब्यात रूपांतर करताना मुंबई डबेवाल्यांचा विचार करावा.

हेही वाचा >>>मुंबई: तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

हेही वाचा >>>मुंबईकरांसाठी खुशखबर! दोन दिवसाच्या तुफान पावसानानंतर ‘हे’ दृश्य पाहून आनंदून जाल

डबेवाल्यांना एका ठराविक कालावधीसाठी मालडबा आरक्षित केला आहे. त्यामुळे डबेवाल्यांकडून आरक्षित डबा हिरावून घेऊ नये. तसेच गेल्या काही वर्षांपासून वातानुकूलित लोकलमध्ये मालडबा जोडण्याची मागणी केली आहे. त्यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The opposition of the dabewala organization to convert local maldabe into senior citizens coach mumbai print news amy