मुंबई : बोरिवली पूर्व परिसरात नवरात्रोत्सवात पूजा आटोपून परतणाऱ्या महिलेला बोलण्यात गुंतवून दोन भामट्यांनी तिचे दागिने पळवल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तिने दोन अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शोभा पुजारी (५३) या कांदिवली पूर्व येथील समता नगर परिसरात राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार १९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ च्या सुमारास पती जया आणि जाव जयंती पुजारी यांच्यासोबत त्या बोरिवली पूर्व येथील देवलापाडा परिसरातील पद्मावती देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. पूजा साधारण १० वाजता संपल्यानंतर त्या पतीसोबत पायीच घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी जया काही अंतर दूर चालत होते. दरम्यान, कार्निवल सिनेमा परिसरात शोभा पोहोचल्यानंतर दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी शोभाला ‘आगे झगडा हुआ है, आपके पास जो सोना है वो अप निकाल कर पर्समे डालकर लेके जाओ’ असे सांगितले. ते ऐकून शोभा घाबरल्या आणि त्यांनी गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र काढून पाकिटामध्ये ठेवले. दोघांपैकी एकाने शोभा यांचे पाकीट स्वतःच्या हातात घेतले आणि दुसऱ्याने त्यांना बोलण्यात गुंतवले. ते पाकीट पुन्हा शोभा यांच्या हातात देऊन ते दोघे मोटर सायकलवरून तिथून निघून गेले.
हेही वाचा – मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील ३०० चौरस मीटरच्या बांधकामांना सीआरझेड सवलत!
हेही वाचा – मुंबई : एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची सायबर फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू
संशय आल्याने शोभा यांनी त्यांचे पाकीट उघडून पाहिले तेव्हा त्यात मंगळसूत्र नव्हते. आरडाओरडा करत त्यांनी पतीला थांबवले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पतीसोबत कस्तुरबा पोलीस ठाण्यात जाऊन अनोळखी भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.