नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईवर उपाय म्हणून मुंबईतील व्यापाऱ्यांनी पाकिस्तानहून मागविलेला सुमारे १५ हजार किलो कांदा गुरुवारी सकाळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात दाखल झाला. या कांद्यामुळे बाजारातील दर कमी होतील, अशी अपेक्षा मात्र फोल ठरली. घाऊक बाजारात दिवसभर उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे ५५ ते ६० रुपयांनी विकला जात होता. किरकोळ बाजारात हा दर आता ७५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
नाशिक जिल्ह्यातून देशभरात निर्यात होणाऱ्या कांद्याचे पीक यंदा घटल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दर मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर किलोमागे ४० रुपयांपेक्षा कमी झाले होते. मात्र, काही दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चाळींमधील कांदा खराब होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मुंबई व आसपासच्या उपनगरांत कांद्याची आवक घटली असून वाशीतील घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ६० रुपयांनी विकला जात आहे, अशी माहिती कांदा- बटाटा आडत व्यापारी संघाचे चंद्रकांत रामाणे यांनी दिली. दरम्यान, कांद्याची आवक घटल्यामुळे मुंबई, पुण्यातील काही व्यापाऱ्यांनी थेट पाकिस्तानहून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीतील घाऊक बाजारपेठेत सुमारे १५ हजार किलो कांदा दाखल झाला आहे, असे रामाणे यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरात कांद्याने भरलेले काही कंटेनर दाखल झाले आहे. तपासणीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा कांदा वाशी बाजारात दाखल झाला. दरम्यान, पाकिस्तानचा कांदा आल्यानंतरही वाशी बाजारातील दर ‘जैसे थे’ राहिल्याचे एपीएमसीचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले.
केंद्राने कांद्याचा निर्यात दर वाढवला
नवी दिल्ली- सध्या देशात कांद्याचे दर चांगलेच कडाडले असून देशांतर्गत बाजारातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे आणि निर्यात कमी व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता कांद्याचा कमीत कमी निर्यात दर प्रति टन ९०० डॉलर इतका निश्चित केला आहे. १४ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कांद्याचा कमीत कमी निर्यात दर प्रति टन ६५० डॉलर इतका ठेवला होता. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीत घट झाली होती. आता निर्यात दरात आणखी वाढ झाल्यामुळे निर्यातीला आळा बसेल. त्यामुळे सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीसाठी प्रति टन कमीत कमी दर ९०० डॉलर इतका असल्याचे परकीय व्यापार महासंचालकांनी अधिसूचनेत म्हटले आहे. कांद्याचे दर नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत़

Story img Loader