मुंबई : डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत पाठय़पुस्तकातून वगळण्याचा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) निर्णयाबाबतचा वाद शमला नसताना आता दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून आवर्त सारणी वगळण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या पुस्तकातून लोकशाही आणि विविधता, चळवळी, राजकीय पक्ष, लोकशाहीसमोरील आव्हाने हे घटकही वगळण्यात आल्याचे उघड झाले आहे.
‘एनसीईआरटी’ने अभ्यासक्रम आराखडा आणि त्या अनुषंगाने पाठय़पुस्तकांमध्ये बदल केले आहेत. करोना साथ कालावधीत विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी पाठय़पुस्तकांतील अनेक घटक कमी करण्यात आले होते. मात्र, अद्यापही त्यांतील अनेक घटक पुस्तकांमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. काहीच दिवसांपूर्वी विज्ञानाच्या पुस्तकातून उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यावरून वाद झाला होता. देशभरातील हजारो शास्त्रज्ञांनी या निर्णयाचा निषेध केला होता. आता दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील रसायन शास्त्रातील आवर्त सारणी वगळल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यशास्त्राच्या पुस्तकातीलही अनेक भाग वगळण्यात आले आहेत. विशेषत: लोकशाहीसंबंधीचे घटक वगळण्यात आले आहेत. या बदलांवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. लोकशाही आणि विविधता, चळवळी, राजकीय पक्ष, लोकशाहीसमोरील आव्हाने हे घटक काढून टाकण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी एकूण अभ्यासक्रमाचे आकारमान कमी करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कृतीतून शिक्षण यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पुस्तकांमध्ये सुधारणा करताना कोणते घटक आणि का वगळावेत याबाबतचे तारतम्य बाळगलेले नाही, असी टीका परिषदेवर होत आहे.
अकरावीच्या पायालाच धक्का
दहावीच्या रसायन शास्त्रातील ‘आवर्त सारणी’ हा घटक अकरावीच्या पुस्तकाचा पाया होता. अकरावीत रसायन शास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या पुस्तकात ‘आवर्त सारणी’ची ओळख होणे अपेक्षित होते. मात्र हा घटक वगळण्यात आला आहे. याशिवाय विज्ञानातील उर्जेचे स्रोत, नैसर्गिक स्रोतांचे सुयोग्य व्यवस्थापन हे घटकही काढून टकण्यात आले आहेत.
पूर्वीचे वादग्रस्त निर्णय..
अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळणे.
गुजरात दंगलीशी संबंधित मजकूर हद्दपार करणे.
अभ्यासक्रमातून नक्षलवादी चळवळीचा भाग काढणे .
दलित चळवळीतील लेखकांची नावे वगळणे.