मुंबई : जास्तीत जास्त आमदारांनी आपल्या बैठकीला उपस्थित राहावे म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंगळवारी प्रयत्न सुरू होते. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची बैठक उद्या होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. अजित पवार गटाने वांद्रे येथील भुजबळ यांच्या संस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित केली आहे.
पक्षाच्या ५३ आमदारांपैकी किती आमदार कोणत्या गटाबरोबर आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित पवार गटाने ४० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. बैठकीला उपस्थित राहावे म्हणून शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडून आमदारांशी दिवसभर संपर्क साधण्यात येत होता. अजित पवार यांच्याकडूनही आमदारांना बैठकीचे निरोप देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच पक्षाध्यक्ष शरद पवार हे उद्या मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वानी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
अजित पवारांचे शासकीय बंगल्यात कार्यालय
उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेवाटप होण्याआधीच त्यांच्या गटाला पक्ष कार्यालय थाटण्यासाठी दोन दिवसांत शासकीय बंगला मिळाला आहे. अजित पवार गटाने ‘प्रतापगड’ या शासकीय बंगल्यात आपले पक्ष कार्यालय सुरू केले असून त्याचे उद्धाटन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पवार, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या कार्यालयातून कामकाज सुरू झाले.
भुजबळांच्या संस्थेतील बैठकीच्या विरोधात तक्रार
वांद्रे येथील ‘एमईटी’ संस्थेत अजित पवार गटाने बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला या संस्थेचे विश्वस्त सुनील कर्वे यांनी विरोध दर्शविला असून ही बैठक या ठिकाणी होऊ नये, यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ‘एमईटी’ही शैक्षणिक संस्था असून धर्मादाय आयुक्त कार्यालयात याची तशी नोंद आहे. या संस्थेवर मंत्री छगन भुजबळ यांच्या जोडीने सुनील कर्वे हे देखील कायमस्वरूपी विश्वस्त आहेत. कर्वे यांनी यापूर्वी देखील भुजबळ यांनी या शैक्षणिक संकुलात बोलावलेल्या राजकीय कार्यक्रमाला विरोध केला होता. या संकुलात तीन ते साडेतीन हजार मुले शिक्षण घेत आहेत. अशाप्रकारच्या राजकीय कार्यक्रमाचा त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना त्रास होतो, म्हणून मी विरोध केला आहे. उद्याचा कार्यक्रम या ठिकाणी होऊ नये, यासाठी मी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली आहे. यापूर्वी देखील मी अशाप्रकारच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे, असे सुनील कर्वे यांनी सांगितले.