विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडून आमदारांचा मानसन्मान राखला जात नाही, अशी तक्रार शेकापचे जयंत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. आपण याची गंभीर दखल घेतली असून या संदर्भात लवकरच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
औचित्याच्या मुद्याद्वारे पोलिसांच्या वर्तनाचा विषय मांडण्यात आला. कायदे करणारे विधिमंडळाचे सदस्य जेव्हा विधानभवनात येतात, त्यावेळी उपस्थित असणारे पोलीस उठून उभे राहात नाहीत, आमदारांचा मान राखत नाहीत. एकदा एक मंत्री आले तरी पोलीस उभे राहिले नाहीत. मात्र थोडय़ाच वेळाने निळ्या दिव्याच्या गाडीतून वरिष्ठ पोलीस अधिकारी आले, त्यावेळी पोलिसांनी उभे राहून त्यांना सलाम ठोकला. एका पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा आमदारांचा दर्जा कमी आहे, का असा सवाल पाटील यांनी केला.  अधिवेशनच्या काळात सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेले पोलीस पायावर पाय ठेवून बसलेले असतात, सारखे मोबाइलवर बोलत असतात, पिचकाऱ्या मारतात, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

Story img Loader