मुंबई : गहाळ झालेले मोबाइल तक्रारदारांना परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र आरसीएफ पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेतला आणि १२ मोबाइल हस्तगत केले. पोलिसांनी हे मोबाइल संबंधितांना परत केले.अनेक जण घाई-गडबडीत बस, रिक्षा अथवा इतर ठिकाणी मोबाइल विसरून जातात. मोबाइल गहाळ झाल्यामुळे संबंधित मंडळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल करतात. गेल्या वर्षभरात आरसीएफ पोलीस ठाण्यात मोबाइल गहाळ झाल्याच्या काही तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेऊन आरसीएफ पोलिसांनी मोबाइलचा शोध सुरू केला. या शोध मोहिमेत १२ मोबाइल हस्तगत करण्यात आले. या मोबाइलच्या मालकांची माहिती मिळवून पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बुधवारी या १२ जणांना आरसीएफ पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांच्या हस्ते त्यांना मोबाइल परत करण्यात आले.