मुंबई: बोरीवली पूर्व येथे नाकाबंदी दरम्यान एकाच दुचाकीवरून तिघे प्रवास करत असल्यामुळे पोलिसांनी रोखले असता आरोपी दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने दुचाकी चालवून सहाय्यक फौजदाराला धडक देऊन जखमी केले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट व चालक परवानाही नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार वसंत सालकर(५०) हे पालघरमधील वसई येथील रहिवासी आहेत. ते सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असून शनिवारी बोरीवली पूर्व येथील ओमकारेश्वर मंदिर येथे नाकाबंदीला तैनात होते. त्यावेळी इतर पोलीस अधिकारी व अंमलदारही उपस्थित होते. त्यावेळी आरोपी किरण माळी(२१) दुचाकीवरून तेथे येत होता. त्याच्या दुचाकीच्या मागे सुजल जाधव (२०) व सिद्धेश शिंदे (१९) हे दोघे बसले होते.

हेही वाचा… मुंबई सेंट्रलमधील बहुमजली इमारतीला आग

दुचाकीवरून तिघे प्रवास करत असल्यामुळे पोलिसांनी किरणला गाडी थांबवल्याचा इशारा केला. पण त्याने भरधाव वेगाने दुचाकी चालवून तक्रारादर सालकर यांना धडक दिली. त्यामुळे सालकर तेथेच खाली कोसळले. त्यामुळे त्याच्या उजव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर किरणने तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे तैनात इतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे हेल्मेट व चालक परवाना नसल्यामुळे याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात भरधाव वेगाने गाडी चालवून पोलिसाला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानतंर याप्रकरणी आरोपी चालक किरण माळी याला अटक करण्यात आली आहे. जखमी सालकर यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच आरोपीने मद्य प्राशन केले होते का? हे तपासण्यासाठी त्याचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police stationed for the blockade was hit by a bike rider in borivali east mumbai print news dvr
Show comments