राज्यातील शालेय मुलांमधील स्थूलपणा रोखण्यासाठी आणि त्यांना सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारने ‘स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान’ हाती घेतले आहे. या मोहिमेला ४ मार्चपासून सुरुवात झाली असून वविध शाळांमधील तब्बल १४ हजार २७८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५४० विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणा आढळून आला. यामध्ये मुंबईतील विद्यार्थाची संख्या अधिक आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने ‘स्थूलता कमी करा शरीराची, कास धरा सुदृढ आरोग्याची’ या घोषवाक्यासह राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थाना आरोग्याचे महत्त्व पटावे यासाठी ‘स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान’ हाती घेतले आहे. याअंतर्गत विविध शाळांमधील सातवी ते नववीमधील विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून देत त्यांची तपासणी करण्यात आली.
राज्यातील १४ हजार २७८ विद्यार्थ्यांच्या तपासणीमध्ये ५४० विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणा आढळला. हे प्रमाण ३.७८ टक्के आहे. यामध्ये मुंबईतील विद्यार्थी सर्वाधिक स्थूल असल्याचे आढळले. मुंबईमध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ९५४ विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यातील १५९ विद्यार्थ्यांमध्ये स्थूलता आढळली. त्याखालोखाल लातूर वैद्यकीय महाविद्यालयाने ७३० विद्यार्थ्यांची तपासणी केली. यातील ५२ विद्यार्थ्यांमध्ये स्थूलता आढळली. तर बारामती (१) आणि चंद्रपूरमध्ये (४) सर्वाधिक कमी विद्यार्थ्यांमध्ये स्थूलता आढळून आली. मोहिमेसाठी समन्वयक म्हणून सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक सावर्डेकर, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राकेश वाघमारे आणि डॉ. मंदार सदावर्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना स्थूलपणाचे तोटे आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून दिल्यास त्यांचे भावी आयुष्य आरोग्यदायी होण्यास मदत होईल. भावी पिढी आरोग्यदायी, सुदृढ व सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल. – डॉ. विनायक सावर्डेकर, अधिष्ठाता, सेंट जॉर्जेस रुग्णालय.