लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातील बदल्या पारदर्शक, निरपेक्ष आणि तत्परतेने व्हाव्यात यासाठी त्या ऑनलाईन माध्यमातून करण्याचे आदेश २०२२ मध्ये देण्यात आले होते. ऑनलाईन माध्यमातून बदल्या करण्यासाठी सामान्य प्रशासनाकडून विशेष ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन बदल्या होणार आहेत. या ॲपवर कर्मचाऱ्यांचे आक्षेप किंवा तक्रारीचेही निरसन करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबर २०२२, ९ नोव्हेंबर २०२२ आणि ५ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बैठकीत बदल्या पारदर्शकता, निरपेक्षपणे व तत्परतेने होण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आरोग्य विभागातील बदल्यांसाठी सामान्य प्रशासनाने २०१८ मध्ये विकसित केलेल्या बदली ॲपचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या ॲपमध्ये कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याबाबत अधिनस्त नियुक्ती प्राधिकारी कार्यालय आणि संस्थांना सूचना दिल्या आहेत. आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या गट-क मध्ये ९८ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या या ॲपद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. बदली ॲपमध्ये संबंधित आरोग्य संस्थांकडून कर्मचाऱ्यांची कार्यरत ठिकाणे व रिक्त पदांची माहिती भरण्यात आलेली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधेनुसार बदली मिळावी म्हणून ॲपमध्ये बदलीपात्र कर्मचाऱ्यांची जेष्ठतासूची, तसेच त्यांच्या अर्जाविषयी आक्षेप नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचा… मुंबई: वृत्तपत्र छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांचे निधन
बदली ॲपमध्ये कर्मचारी स्वतः किंवा संस्थेमार्फत अर्ज करू शकतील. कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उपसंचालक स्तरावर त्यांची माहिती तपासण्यात येणार आहे. अर्ज निश्चिती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना बदलीचे आदेश ॲपद्वारे त्वरित मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बदली ॲपद्वारे बदली प्रक्रिया राबविल्यास त्याचा कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात प्रथमःच ऑनलाईन बदल्या होणार आहेत.
बदली ॲपमधील महत्त्वपूर्ण बाबी
- ॲपमध्ये अवघड क्षेत्र व बिगर अवघड क्षेत्राला शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रम दिला आहे.
- कर्मचाऱ्यांना त्यांचा अर्ज तपासण्याची सुविधा तसेच कर्मचाऱ्यांच्या बदलीशी संबंधित माहिती म्हणजे १० पसंतीक्रम किंवा विकल्प भरण्याची सोय.
- अर्जासंदर्भातील माहितीचा संदेश मोबाइलवर प्राप्त होण्याची सुविधा.
- ऑनलाईन रिक्त पदांची स्थिती, कर्मचाऱ्यांची स्वतःची माहिती तपासण्याची सुविधा.
- आरोग्य कर्मचारी सहज बदलीसाठी अर्ज करू शकतील.
- बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शता असेल व वेळेची बचत होईल.