मुंबई : वरळीतील सुप्रसिद्ध ‘सत्यम’ चित्रपटगृहाच्या जागेचे आरक्षण बदलण्यात येणार आहे. हे प्रसिद्ध चित्रपटगृह गेली सुमारे २९ वर्षे बंद असल्यामुळे या जागेवरील चित्रपटगृहाचे आरक्षण बदलण्याची मागणी अर्जदार संस्थेने केली होती. त्याकरीता पालिकेच्या विकास नियोजन विभागाने आरक्षण बदलाची नोटीस जाहीर केली असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.
मुंबईतील एकेकाळच्या सुप्रसिद्ध चित्रपटगृहांपैकी एक असलेले वरळीतील सत्यम चित्रपटगृह गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. ‘सत्यम’, ‘सचिनम’, ‘सुंदरम’ अशा तीन चित्रपटगृहांचे संकुल असलेले हे चित्रपटगृह आता कागदोपत्रीही इतिहासजमा होणार आहे. या चित्रपटगृहाची जमीन महापालिकेने भाडेकरारावर दिली होती. हा भाडेकरार करणाऱ्या कंपनीने आरक्षण बदलण्याची विनंती महापालिकेला केली होती. त्यानुसार महापालिकेने आता एमआरटीपी कायद्याअंतर्गत आरक्षण बदलाची नोटीस जाहीर केली आहे. तसेच त्यावर हरकती व सूचना मागितल्या आहेत.
‘सत्यम’ चित्रपटगृहाचे आरक्षण बदलल्यास या परिसरातील लोकांच्या मनोरंजनावर कोणताही परिणाम होणार नाही. याच परिसरात गेल्या काही वर्षात आणखी दोन मोठी चित्रपटगृहे उभी राहिली आहेत. त्यामुळे हे आरक्षण बदलण्याकरीता जाहिरात देण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत याबाबत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना देण्याचे, आवाहन विकास नियोजन विभागाने केले आहे.