मुंबई: जे.जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागाच्या प्रमुखांकडून होत असलेला छळ आणि देण्यात येणाऱ्या धमक्यांविराेधात निवासी डॉक्टरांनी आजपासून सामुहिक सुट्टी आंदोलन सुरू केले आहे. विभागप्रमुखांना तात्काळ पदावरून हटवावे, चौकशी करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा निवासी डॉक्टरांना वारंवार त्रास देऊन त्यांचा छळ करतात. तसेच आपण वरिष्ठ पदावर असून, लवकरच जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता होऊ शकतो, अशी धमकी देत असल्याने निवासी डॉक्टर मानसिक दडपणाखाली वावरत आहेत, असा आरोप जे.जे. मार्डचे अध्यक्ष डॉ. शुभम सोनी यांनी केला आहे.

निवासी डॉक्टरांनी याप्रकरणी ९ डिसेंबर रोजी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने १५ डिसेंबर रोजी मार्डने रुग्णालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून विभागप्रमुख कुरा यांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा १८ डिसेंबरपासून सामुहिक रजा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. त्यामुळे जे.जे. रुग्णालय अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी तातडीने चौकशी समिती स्थापन केली.

हेही वाचा… महाराष्ट्रात ‘आयुष्यमान भारत’चे नऊ लाख लाभार्थी; लाभार्थी राज्यांमध्ये महाराष्ट्र १२ व्या स्थानावर

या चौकशी समितीचा अहवाल तातडीने सादर करण्यात यावा आणि विभागप्रमुखांवर कठोर कारवाई करून त्यांना विभागप्रमुख पदावरून हटवावे या मागणीवर ठाम राहत जे.जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांनी सोमवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सामुहिक रजा आंदोलनाला सुरू केले. डॉ. महेंद्र कुरा यांना विभागप्रमुख पदावरून हटविण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, तसेच याप्रकरणी तातडीने निर्णय न घेतल्यास जे.जे. रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी होतील, असे जे.जे. मार्डचे अध्यक्ष शुभम सोनी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी प्राध्यापकांवर

त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांनी सामुहिक रजा आंदोलन पुकारल्याने बाह्यरूग्ण विभागावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सह प्राध्यापक यांच्याकडे बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तूर्तास रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही.

निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भात सध्या मी कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. – डॉ. महेंद्र कुरा, विभागप्रमुख, त्वचारोग विभाग, जे.जे. रुग्णालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The resident doctors have started a mass strike against the harassment and intimidation by the head of the dermatology department of the jj hospital mumbai print news dvr