मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुण्याकडे येणारी मार्गिका खालापूर टोल नाका दरम्यान दुपारी १२ ते २ या काळात सुमारे दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे वाहतूक विभागाचे अप्पल पोलीस महासंचालक विजय पाटील यांनी केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोल नाक्याच्या आगोदर किमी १७/००० जवळ ओव्हरहेड ग्रॅन्ट्रीज बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक शेंडूंग फाटा येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (जुना मुंबई-पुणे) मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहनचालकांनी शेंडूंग फाटा-दांड फाटा-चीक (कर्जत) फाटा-खालापूर फाटा (सावरोली फाटा) येथून खालापूर मार्गे परत खालापूर टोल नाका येथून पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना एक्स्प्रेस हायवेवरील चिखले ब्रीज किमी क्र. ७.४०० पासून मागे थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.