मुंबई : महानगरपालिकेतर्फे रस्ते धुऊन स्वच्छ करणे, रस्त्यावरील धूळ साफ करणे, कचरा उचलणे आदी कामांसाठी वेगवेगळ्या अद्ययावत यंत्रांचा वापर केला जातो. रस्ते स्वच्छतेची कामे आणखी प्रभावी व्हावीत, यासाठी घनकचरा विभागाच्या ताफ्यात ७ यांत्रिकी झाडू आणि ८ कचरा उचलणाऱ्या यंत्रांची भर पडणार आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत ही यंत्रे पालिकेच्या घनकचरा विभागाच्या ताफ्यात दाखल होणार असल्यामुळे मुंबईतील रस्ते आणखी स्वच्छ होतील.
महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवून मुंबईतील विविध भागांची व रस्त्यांची स्वच्छता केली जाते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावला असून हवेचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रस्त्यावरून उडणारी धूळही हवाप्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येताच महापालिकेने रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला. महापालिकेने सप्टेंबर २०२४ मध्ये १७ यांत्रिकी झाडू आणि २१ कचरा उचलणाऱ्या यंत्रांची मागणी केली. त्यापैकी ९ यांत्रिकी झाडू आणि १४ कचरा उचलणारी यंत्रे घनकचरा विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. सद्यस्थितीत मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रत्येकी दोन अशा एकूण ४ यांत्रिकी झाडूंच्या साहाय्याने स्वच्छता केली जाते. तर, उर्वरित यांत्रिकी झाडू अन्य महामार्गावर तैनात करण्यात आले आहेत. तसेच, मुंबईतील सात परिमंडळात १४ पैकी प्रत्येकी १ अशी एकूण ७ कचरा उचलणारी यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून, पालिकेच्या विविध विभागांत या यंत्राद्वारे रस्ते स्वच्छता केली जात आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत उर्वरित ८ यांत्रिकी झाडू आणि ७ कचरा उचलणारी यंत्रे पालिकेच्या ताफ्यात दाखल होतील. त्यांनतर महापालिकेच्या सर्व विभागांत कचरा उचलणारी यंत्रे कार्यान्वित केली जातील.
महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत यंत्रांची भर पडत असल्यामुळे लवकरच मुंबईतील रस्ते आणखी स्वच्छ होतील. तसेच, रस्त्यांवरून उडणाऱ्या धुळीमुळे वाढणारे हवा प्रदूषणही नियंत्रणात राहण्यास या यंत्रामुळे मदत होईल.