मुंबई : असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असून देशातील ६० टक्क्यांहून अधिक मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे असंसर्गजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी एकात्मिक आणि लोकोपयोगी दृष्टिकोन आवश्यक आहे. असंसर्गजन्य आजार प्रतिबंध, काळजी आणि धोरणात्मक जबाबदारी याबाबत समाजात योग्य दृष्टिकोन निर्माण करण्याची मोठी ताकद माध्यमांमध्ये आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मुंबईमध्ये असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येवर चर्चा करण्यासाठी रिसोर्स ग्रुप फॉर एज्युकेशन अँड ॲडव्होकसी फॉर कम्युनिटी हेल्थ (रिच) या संस्थेद्वारे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पत्रकार आणि रुग्णांच्या हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
किशोरवयीन मुला-मुलींमध्ये लवकर जनजागृती करणे महत्त्वाचे असून, प्रौढांमध्ये निदान होणाऱ्या सुमारे ७० टक्के असंसर्गजन्य आजारांचे मूळ पौगंडावस्थेतील जीवनशैलीच्या सवयींमध्ये दिसून येते. त्यामुळे किशोरवयीन आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याची तातडीची गरज आहे. तरुण पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी व त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी माध्यमांचा शक्तिशाली साधन वापर करता येईल, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुप्रिया अरवारी यांनी सांगितले.
कर्करोगावर मात करणाऱ्या व्यक्तीचे अनुभव लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी उपलब्ध असलेल्या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे, असे मत इंडियन कॅन्सर सोसायटीच्या उपमहासंचालक डॉ. वंदना धामणकर यांनी व्यक्त केले.
महिला आणि लिंगभेदांवर केंद्रित संशोधनात तातडीने गुंतवणूक करण्याची गरज व्यक्त करत ज्येष्ठ एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. उषा श्रीराम यांनी माध्यमांनी लिंग संवेदनशील दृष्टिकोन वापरून प्रतिबंधात्मक संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवले पाहिजेत, असे मत मांडले.
करोनानंतर प्रत्येकजण मानसिक आरोग्यावर बोलू लागला आहे, पण आपण यावर जबाबदारीने बोलत आहोत का याचा विचार करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्यामध्ये सनसनाटीपणा टाळून, व्यावसायिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित, सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन जपणारी कथनशैली अवलंबणे गरजेचे आहे, असे असे सांगत मारिवाला आरोग्य संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती श्रीधर यांनी सांगितले.
पत्रकारांनी पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठता, तथ्यात्मक अचूकता आणि निष्पक्ष वार्तांकन करताना नेहमी विश्वसनीय तज्ज्ञांचा संदर्भ घेऊन स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. असंसर्गजन्य रोगांविषयी जागरूकता, सेवा उपलब्धता, परवडणारी क्षमता आणि उपचारांच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकणे आवश्यक असल्याचे मत वरिष्ठ पत्रकार विश्वनाथ पिल्ला यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुकृती चौहान यांनी केले. परिषदेची सुरुवात ‘रिच’च्या उपसंचालिका अनुपमा श्रीनिवासन यांनी केली.