मुंबई : आरक्षणासाठी मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्यास तसेच त्यांना ओबीसी कोटय़ांमधून आरक्षण देण्यास ओबीसी जनमोर्चा या संघटनेने विरोध केला आहे. संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे व कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी मराठा समाजाला घाईघाईने ओबीसी कोटय़ातून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर, हा समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे. जालना येथील अंतरवली सराटे येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत, त्या ठिकाणी उपस्थित जमावावर पोलिसांनी लाठीमार केला, त्याचा ओबीसी जनमोर्चाने निषेध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, त्यांना ईडब्ल्यूएसमधून आरक्षण मिळतेच आहे, ते वाढवावे किंवा घटनादुरुस्ती करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. दुसरे असे की, राज्यातील ओबीसी व मराठा समाजाची नेमकी किती लोकसंख्या आहे, त्याची निश्चित अशी आकडेवारी नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना करावी, त्यामुळे ओबीसी व मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे ते कळेल, त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीची माहिती उपलब्ध होईल. त्याआधारे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढता येईल.

हेही वाचा >>>मुंबई: प्लास्टिकविरोधी कारवाईतून २४ लाख रुपये दंड वसूल; एका दिवसात ५९७ दुकाने व आस्थापनांना भेटी

राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये, त्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्रे देण्यात येऊ नयेत, अशी मागणी शेंडगे यांनी केली आहे. घाईघाईने असंविधानिक मार्गाने ओबीसी कोटय़ातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास, ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, त्याचबरोबर आगामी निवडणुकीतही त्याचे परिणाम दिसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.