मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यापूर्वीच्या तीन विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने ही परंपरा आता खंडित होणार का, याचीच कुजबुज सभागृहात सुरू होती. वडेट्टीवार यांच्या नियुक्तीची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या पदावर विराजमान व्यक्तीची जबाबदारी अधिक आहे. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार हे सभागृहाची परंपरा उत्कृष्टपणे चालवतील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी व्यक्त केला.
लोकशाही सक्षम राहण्यासाठी विरोधी पक्षनेता महत्त्वाचा असून विकासकामांसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एखादी गोष्ट पटली नाही तर जरूर टीका करावी, मात्र चांगल्या गोष्टीचे विरोधकांनी कौतुकही करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. जनतेच्या हितासाठी वडेट्टीवार व्यापक कार्य करतील. ते संवेदनशील नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा सभागृहाला होईल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तर विरोधी पक्षनेता म्हणून वडेट्टीवार जनतेच्या भावना तडफेने मांडतील असे अजित पवार यांनी सांगितले.
सर्वसामान्यांसाठी आवाज उठविणार- वडेट्टीवार
मोठय़ा संघर्षांतून या पदापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण मला आहे असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.