मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना प्रचार करणे सोयीचे व्हावे यासाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्याचा आरोप झाला असताना, विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात यावे, अशी आग्रही मागणी सत्ताधारी महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटाने केली. ठाकरे गटानेही हाच सूर लावला असला तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मौन बाळगले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी एका टप्प्यात निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी शिंदे गट, अजित पवार गट आणि ठाकरे गट आग्रही राहिले. २०१९ची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदाही एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात पाच टप्प्यांत मतदान का घेण्यात आले, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी केला. कोणाच्या सोयीसाठी मतदान एवढे लांबविण्यात आले होते, अशी विचारणाही त्यांनी केली.

हेही वाचा >>>Mega Block On Central Railway : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक;असं असेल लोकलचं वेळापत्रक

विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तसे संकेत दिले होते.मात्र, शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक किती टप्प्यांत घ्यावी याबाबत आम्ही भूमिका मांडलेली नाही, असे शरद पवार गटाचे रविंद्र पवार आणि काँग्रेसचे डॉ. गजानन देसाई यांनी सांगितले. बैठकीला शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

‘सलग सुट्ट्यांत मतदान नको’

विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान दिवाळीची सुटी, शनिवार-रविवार आणि सलग सुट्ट्या असताना घेऊ नये आणि ते मंगळवार, बुधवार किंवा गुरुवारी घ्यावे, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, विश्वास पाठक यांनी निवडणूक आयोगासमोर पक्षाची भूमिका मांडली.

हेही वाचा >>>मुंबईत शनिवारी हलक्या सरी; राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

‘निवडणूक खर्च वाढवा’

निवडणूक खर्चात ४० लाखांवरून ६० लाखांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबरोबर शिंदे गटानेही केली. निवडणूक खर्च वाढला आहे. त्यातच उमेदवारांना त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती जाहिरात स्वरुपात द्यावी लागते. यामुळे खर्च वाढतो अशी भूमिका रागर्जे यांनी मांडली.

‘पिपाणी’ चिन्ह गोठवा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिन्ह हे तुतारी आहे. निवडणूक आयोगाकडून तुतारीच्या साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह अपक्षांना वाटप केले जाते. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाचा शरद पवार गटाला फटका बसला होता. राज्य निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह हे यादीतून गोठविले आहे. या धर्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगानेही पिपाणी चिन्ह गोठवावे वा अपक्षांना ते दिले जाऊ नये, अशी मागणी करण्यात आल्याचे शरद पवार गटाचे नेते रविंद्र पवार यांनी सांगितले.

‘मतदारांना सुविधा द्या’

एका मतदान केंद्रावर दीड हजार मतदारांची मतदानाची सोय असते. पण ६० टक्के मतदान गृहीत धरल्यास मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे मतदान केंद्रावर दीड हजारांपेक्षा कमी मतदारसंख्या असावी. मतदान नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने त्यावेळी उकाडा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर पंखे, पिण्याचे पाणी, रांगेतील मतदारांसाठी निवारा शेड आदी व्यवस्था असावी. मतदान केंद्रात मोबाईल व बॅग नेण्यास मनाई केली जात असल्याने अनेक मतदार मतदान करण्याचे टाळतात. त्यामुळे बॅगा ठेवण्यासाठी टोकन सुविधा असावी, आदी मागण्याही करण्यात आल्या.