मुंबई : विविध क्षेत्रांत स्त्रिया आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. या यशस्विनींचा शोध घेऊन त्यांचा गौरव करणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’चे व्यासपीठ खुले झाले असून, त्यासाठी अशा स्त्रियांची माहिती १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
समाजासाठी सर्वथा प्रेरणादायी ठरणाऱ्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा ‘लोकसत्ता’तर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गौरव केला जातो. त्यासाठी राज्यभरातून अशा कर्तबगार स्त्रियांची नामांकने मागवून त्यातून तज्ज्ञ परीक्षकांची समिती नऊ दुर्गाची निवड करते आणि त्यांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ दरवर्षी प्रदान केला जातो. गेली नऊ वर्षे हा उपक्रम सुरू आहे.
यंदाही शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कृषी, उद्योग, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील ‘नवदुर्गा’चा शोध सुरू आहे. ‘नवदुर्गा’च्या निवडीनंतर नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाणार आहे. तसेच त्यानंतर होणाऱ्या रंगतदार सोहळय़ात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गाचा सन्मान केला जाणार आहे.
काय अपेक्षित?
- कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती पाठवता येईल. संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे असावे. माहिती सुमारे ५०० शब्दांत पाठवावी.
- संबंधित स्त्रीचे वेगळेपण, तिचा संघर्ष, विधायक, प्रेरणादायी कामाची माहिती देणे आवश्यक आहे. त्याबरोबर त्या स्त्रीचे छायाचित्र, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी पाठवणे आवश्यक.
माहिती कुठे पाठवाल?
- माहिती loksattanavdurga2023@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावी.
- टपालाने माहिती पाठवायची असल्यास पत्ता पुढीलप्रमाणे- ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१०’.