मुंबई : महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांचे जागावाटप अखेर मंगळवारी जाहीर झाले. त्यानुसार शिवसेना २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी १० जागा लढविणार आहे. मात्र सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीमध्ये मात्र जागावाटपावर अद्याप संभ्रम असून ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, वायव्य मुंबई अशा किमान पाच जागांवर तिढा कायम आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून महिनाभर पेच निर्माण झाला होता. आघाडीचे जागावाटप राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. महायुतीच्या पत्रकार परिषदेचा मुहूर्त दोन आठवडय़ांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला होता. मात्र जागावाटपाचा तिढा सोडविण्यात अद्यापही यश आलेले नाही.

कोणी किती जागा लढवायच्या यावर सहमती नाही. भाजपला ३० ते ३२ जागा हव्या आहेत. उर्वरित जागा शिंदे आणि पवार गटाला देण्याचे भाजपच्या मनात आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताणून धरल्याने जागावाटपावर एकमत झालेले नाही. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतर आठवडाभरानंतर पु्न्हा भटेण्याचे ठरल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र ही भेट अद्याप होऊ शकलेली नाही.

हेही वाचा >>>निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस; ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची राजकीय बैठक

मुख्यमंत्री शिंदे यांना कमीत कमी १३ ते १४ जागा हव्या आहेत. अजित पवार गटानेही आठ ते नऊ जागांची मागणी लावून धरली आहे. मात्र एवढय़ा जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही. त्यातच भाजपच्या दबावामुळे शिंदे गटातील रामटेक, यवतमाळ-वाशीम आणि हिंगोलीमधील खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर आता ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, वायव्य मुंबई, पालघर या मतदारसंघांवरून रस्सीखेच सुरूच आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची आहे. मात्र भाजपचाही या जागेवर डोळा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजप ठाण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेना किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बंधूसाठी सोडण्यास भाजपची अद्यापही तयारी नाही. नाशिकची जागा शिवसेनेला सोडण्यास भाजपने नकार दर्शविला आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी, अशी भाजपची भूमिका आहे. दक्षिण मुंबई आणि वायव्य मुंबई या शिंदे गटाला मिळू शकणाऱ्या जागांवरही भाजपने दावा केला आहे. त्यामुळेच महायुतीत अद्यापही एकमत होऊ शकलेले नाही. भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्याचे पडसाद अलीकडेच पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत उमटले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The seat allocation of the three component parties in mahavikas aghadi was finally announced on tuesday amy