मुंबई : मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी समुद्रात एका बाजूचा गर्डर स्थापन झाल्यानंतर आता दुसऱ्या बाजूचा गर्डर स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र सोमवारी झालेल्या वादळामुळे समुद्रही खवळलेला असून दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम लांबणीवर पडले आहे. हे काम आता दोन दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान संपूर्ण सागरी किनारा मार्ग सुरू होण्याची मुदत आता जूनच्याही पुढे जाणार आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प असे नाव या प्रकल्पाला देण्यात आले असून या प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राईव्हपर्यंतची मार्गिका सध्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. हा मार्ग वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकाला जोडण्यासाठी वरळी परिसरात समुद्रात पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या दोन खांबामधील अंतर वाढवावे यासाठी वरळीतील मच्छिमारांनी समुद्रातील प्रकल्पाची काम अनेक महिने रोखल्यामुळे सागरी मार्ग आणि सागरी सेतू परस्परांना जोडण्याचे काम रखडले होते. त्यामुळे सध्या केवळ वरळीपासूनचा मार्ग सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर वरळीतील पुलाच्या दोन खांबांमधील अंतराचा मुद्दा मिटला होता व पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आता या पुलाचे गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील गर्डर गेल्या महिन्यात बसवण्यात आले आहेत. तर उत्तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील तीनपैकी एक गर्डर वरळीत दाखल झाला आहे. हा गर्डर बसवण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. मात्र सोमवारी वादळी वाऱ्यांमुळे व समुद्र खवळलेला असल्यामुळे गर्डर बसवण्याचे काम दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानंतरही समुद्रातील स्थितीचा अंदाज घेऊन पुढील नियोजन केले जाणार आहे.

हेही वाचा – सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या निकालात वाढ, राज्याचा निकाल किती?

जून अखेरीस दक्षिण मुंबईच्या दिशेने सुसाट प्रवास

मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या बाजूला स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. जून अखेरीस ही बाजू पूर्णतः सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच उपनगरातून येणाऱ्या वाहनांना थेट वांद्रे वरळी सागरी सेतूवरून सागरी किनारा मार्गावरून दक्षिण मुंबईत येता येणार आहे. पूर्ण सागरी किनारा मार्ग सुरू होण्यासाठी वाट बघावी लागणार.

हेही वाचा – …अन पार्थ पवारांचा पराभव आम्ही विसरू शकत नाहीत – संजोग वाघेरे

सागरी किनारा मार्गाची वरळीच्या दिशेने जाणारी मार्गिका अद्याप तयार झालेली नाही. ही मार्गिका सुरू करून संपूर्ण सागरी किनारा प्रकल्प सुरू होण्यासाठी मे अखेरीसची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत आता पुढे ढकलली असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरा गर्डर स्थापन केल्यानंतर आणखी दोन लहान गर्डर स्थापन करावे लागणार आहेत. त्यानंतर सिमेंट कॉंक्रीटीकरणाची कामे करून मग ही बाजू सुरू होऊ शकणार आहे. समुद्रातील स्थिती आणि पावसाळ्यातील स्थिती यामुळे कामे पूर्ण करण्यास किती वेळ मिळेल यावर हे सारे अवलंबून आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प आता जूनपूर्वी सुरू होऊ शकणार नाही.

Story img Loader