लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : सात खासदार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीपद देऊन बोळवण करण्यात आली, पण त्याच वेळी कुमारस्वामी, चिराग पासवान किंवा जीतनराम मांझी या शिंदे यांच्या पक्षापेक्षा कमी खासदार असलेल्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. यावरून भाजपने महाराष्ट्रातील शिंदे व अजित पवार या दोन्ही मित्र पक्षांना फारसे महत्त्व दिलेले नाही हेच स्पष्ट होते. एकच खासदार असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला राज्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवून अजितदादांना फारसे महत्त्व देत नाही हे दाखवून दिले.

राज्यात भाजपला सत्तेत आणण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भाजपने केवळ एक राज्यमंत्रीपद (स्वतंत्र कार्यभार) देऊन बोळवण केली आहे. तेलुगू देसमचे १६ तर संयुक्त जनता दलाचे १२ खासदार असल्याने या पक्षांना मंत्रिमंडळात प्रत्येकी दोन मंत्रिपदे देण्यात आली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार असूनही केवळ एक राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) देण्यात आले आहे. पाच खासदार असलेले चिराग पासवान, तीन खासदार असलेले संयुक्त जनता दलाचे कुमारस्वामी किंवा केवळ एकच खासदार असलेल्या बिहारमधील हिंदुस्थानी अवामी मोर्चाचे जीनतराम मांझी यांची कॅनिबेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा >>>पवई भीमनगरमध्ये पोलिसांची दडपशाही? बेदम मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट; म्हणाले, “हा रुमाल बांधलेला माणूस…”

राज्यातील घटक पक्षांकडे दुर्लक्ष

कमी खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात काहीच हरकत नव्हती. पण शिंदे यांनी फार आग्रह धरला नसावा किंवा भाजपने त्यांची मागणी मान्य केली नसावी. अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांच्यासाठी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी भाजपने मान्य केली नाही. यावरून भाजप राज्यातील शिंदे व अजित पवार गट या दोन्ही मित्र पक्षांना फारसे महत्त्व देत नाही हेच पुन्हा सिद्ध झाले. त्याच वेळी राज्यातून नऊ खासदार निवडून आलेल्या भाजपने आपल्या चौघांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.