मुंबई : कामगार विभागाने सर्वोच्च न्यायालय, भारताचे नियंत्रक व महालेखापाल तसेच केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करत ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’चे (बीओसीडब्लू) सामाजिक सर्वेक्षण करण्याचे काम एका सॉफ्टवेअर कंपनीला दिले आहे. निधीची उधळपट्टी लपवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. राज्यातील २२ लाख बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी प्रकल्प किमतीच्या २ टक्के उपकर (सेस) विकासक मंडळाला देतात. मंडळाकडे उपकराचे २० हजार ६०३ कोटी रुपये जमा आहेत. शासनाच्या अखत्यारितील ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी’कडून राज्याच्या कल्याणकारी योजनांचे ‘सामाजिक अंकेक्षण’ (सोशल ऑडिट) करण्याचे निर्देश आहेत. मात्र बांधकाम कामगार मंडळाने आजपर्यंत एकदाही सामाजिक सर्वेक्षण केलेले नाही. लोकसत्ताने २८ ऑक्टोबर २०२३ रोजी यासंदर्भात वृत्त दिले होते. त्यानंतर मंडळाने सामाजिक अंकेक्षणाचे काम पारदर्शकता सोसायटीला जानेवारी २०२४ मध्ये दिले. मात्र ऑगस्टमध्ये ते अचानक रद्द केले आणि एका खाजगी कंपनीला ४ कोटी ९३ लाखांना दिले. ही कंपनी मंडळाच्या उपकराच्या व्यवस्थापनासाठी नियुक्त होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निर्णय झाला. या काळात कामगार मंत्री भाजपचे सुरेश खाडे होते तर विभागाच्या प्रधान सचिव वनिता वेद सिंघल होत्या. खाडे यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात मंडळाने १२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, निधीची उधळपट्टी चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सामाजिक सर्वेक्षणाचे काम सॉफ्टवेअर क्षेत्रातील अननुभवी कंपनीला दिल्याचा आरोप बांधकाम कामगारांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील ‘सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन’ मंचने केला आहे.

अंकेक्षणासाठी चालढकल

●आरोपाबाबत कामगार विभागाच्या विद्यामान प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी बोलण्यास नकार दिला. ‘मंडळाच्या ‘सामाजिक अंकेक्षणा’चे काम पारदर्शकता सोसायटीला देण्याचा निर्णय झाला असून आदेश तयार होत आहे’, असे मंडळाचे कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.

● सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या सामाजिक अंकेक्षणासंदर्भतला २०१८ मध्ये निवाडा दिला होता. जानेवारी महिन्यात याविषयी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत न्या. लोकूर (निवृत्त) यांनी कामगार मंडळाचे सामाजिक अंकेक्षण करण्यास महाराष्ट्र शासन चालढकल करत असल्याबद्दल टीकाही केली होती.

शासनाकडून संस्थेची स्थापना

सामाजिक सर्वेक्षणासाठी शासनाने ‘महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी’ स्थापन केली. योजनेच्या ०.५ टक्के रक्कम त्यासाठी दिली जाते.

मी मंडळाचा अध्यक्ष होतो, तरी सामाजिक अंकेक्षणाचे काम देण्याचा निर्णय विभागाच्या प्रधान सचिवांचा होता. माझ्या कार्यकाळात मंडळाने निधी खर्च केला, तो निविदा मागवून आणि मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केला आहे. सुरेश खाडे, तत्कालीन कामगार मंत्री.