मुंबई : पुणे ३० तास.. मुंबई २८ तास.. ठाणे १५ तास.. नाशिक १३ तास.. राज्यभर गुरुवारी निघालेल्या विसर्जन मिरवणुकांना लागलेल्या वेळेची चर्चा शुक्रवारी लाडक्या गणरायाच्या निरोपापेक्षाही जास्त रंगली. बुद्धीची देवता असलेल्या गणेशाची पाठवणी करताना विवेकबुद्धीचा वापर न करता करण्यात आलेला वाद्यांचा, डीजेचा दणदणाट यंदाही ध्वनिप्रदूषणाचे सर्व विक्रम मोडणारा ठरला. पुण्यात ध्वनिप्रदूषणाने ११८ डेसिबलची पातळी नोंदवली तर, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या शहरांतील आवाज कानठळय़ा बसवणारा ठरला. विशेष म्हणजे, यापैकी अनेक शहरांत चोवीस तासांनंतरही ध्वनिप्रदूषणाची आकडेवारी उघड करण्यात आली नव्हती.
दहा दिवसांच्या आदरातिथ्यानंतर गुरुवारी गणरायाला थाटामाटात निरोप देण्यात आला. मात्र, या जल्लोषात ध्वनी, प्रकाश यांच्या प्रदूषणाचे भान हरवून गेल्याचे राज्यभर पाहायला मिळाले. दहा-बारा-वीस ध्वनिवर्धकांच्या भिंती, त्यातून बाहेर पडणारा कर्णभेदक ध्वनी, सोबत ढोलताशांचा तडतडाट आणि हे सगळे पाहण्यापूर्वीच डोळे दीपवणारे प्रखर दिवे हे चित्र सर्वत्र होते. जल्लोषासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या वेळमर्यादेचे उल्लंघन सर्रास करण्यात आले. रुग्णालये किंवा अन्य शांतता क्षेत्रांतील ध्वनिमर्यादा गुरुवारी कुणाच्या खिजगिणतीतही नव्हती. पुण्याच्या ‘सीओईपी’ तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या चमूने गुरुवारी दुपारी चार ते शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान केलेल्या मोजणीनुसार लक्ष्मी रस्त्यावरील ध्वनीची पातळी कमाल ११८.५ डेसिबल इतकी नोंदवण्यात आली.
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी शहराच्या अनेक भागात मिरवणुकांदरम्यान आवाजी पातळीचे यंत्राद्वारे मापन केले. यामध्ये राम मारुती रोड, गोखले रोड, मल्हार सिनेमागृह, विष्णू नगर, साईबाबा मंदिर, तीन पेट्रोल पंप, चरई, ठाणे महापापालिका मुख्यालय, पाचपाखाडी, उपवन, पोखरण रस्ता क्रमांक २, जे. के. शाळा कॅडबरी जंक्शन या परिसरात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झाल्याचे आढळून आले आहे. अनेक ठिकाणी ध्वनीची पातळी ११० डेसिबलपेक्षाही जास्त झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, तर रात्रीच्या वेळी निवासी क्षेत्रात ४५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७० डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे.
मुंबई उच्च न्यायालयानेही यासंदर्भात काटेकोर नियमावली आखून दिली आहे. तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, मुंबईसह अनेक ठिकाणी झालेल्या ध्वनिप्रदूषणाची नोंदही शुक्रवारी उशिरापर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती. मुंबईत स्वतंत्रपणे आवाजाची मोजणी करणाऱ्या आवाज फाऊंडेशनने आवाजाच्या पातळीची नोंद केली असली तरी, शुक्रवारी शहरभर झालेल्या ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीतील ध्वनीप्रदूषणासह दोन्ही दिवसांचे आकडे शनिवारी जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी तर ‘ध्वनिप्रदूषण झाल्याच्या एकाही प्रकरणाची नोंद नाही तसेच याबाबत एकही तक्रार आलेली नाही’ असे सांगितले.
अहवाल कोणाचा, कोणाला?
मुंबई पोलिसांनी मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाची नोंद केली असून त्या आकडेवारीचा एकत्रित अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर केला जाईल व त्यांच्या तक्रारीच्या आधारे कारवाई केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर, प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राज्यातील ध्वनीपातळीचे मोजमाप करून त्याचा अहवाल शासनाकडे देण्यात येतो, असे मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ध्वनीप्रदूषणाचा अहवाल नेमका कोणाचा, कोणाला आणि कारवाई कोण करणार याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, मुंबईत कोठेही डीजेचा वापर झाला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मिरवणुका अशा..
- पुण्यात मिरवणूक सोहळय़ाची साडेतीस तासांनी सांगता. गेल्या वर्षी २८ तास २९ मिनिटे मिरवणूक चालली होती.
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ठरल्याप्रमाणे सायंकाळी चार वाजता मिरवणुकीत सहभागी आणि रात्री नऊपूर्वीच गणपतीचे विसर्जन.
- मुंबईमध्ये विसर्जन सोहळा २८ तासांहून अधिक काळ सुरू होता. शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत गणेशमूर्तीचे विसर्जन.
- कोल्हापुरात चपलांचा खच. चार डंपर चपला गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्याची पालिकेवर वेळ.
राजकीय नेत्यांपासून ते सर्वच यंत्रणांनी ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. तसेच नियमांचे उल्लंघन झाले तर यंत्रणांनी कारवाई करायला हवी. शहरात ध्वनी प्रदुषण होत आहे की नाही, याची मोजदाद करण्याचे काम सरकारी यंत्रणांचे आहे. पण, या यंत्रणा त्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. – डॉ. महेश बेडेकर, ठाणे
गणेश मंडळे, पोलिसांकडून ध्वनिपातळीच्या नोंदी घेण्याकामी सहकार्य करण्यात आले. करोना महासाथीनंतरच्या सलग दोन वर्षांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण उच्चांकी पातळीवर गेली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचे दोन दिवस लक्ष्मी रस्ता आणि मध्यवर्ती पेठांतील रहिवाशांसह मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी असह्य होत असल्याचे दिसून येते. – डॉ. महेश शिंदीकर, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ