मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याच्या वाद प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती, आमदार रवी राणा यांनी केलेला अर्ज मंगळवारी विशेष न्यायालयाने फेटाळला. तसेच, दोघांनाही आरोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी ५ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी करणारा राणा दाम्पत्याचा अर्ज फेटाळत असल्याचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूंचा तपशीलवार युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने त्यावरील निर्णय राखून ठेवला होता.
ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. असे करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून दोघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत.आपल्याविरोधात दाखल केलेले आरोपपत्र हे केवळ आपली प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी आणि तिला हानी पोहोचवण्यासाठी तयार केल्याचा दावा राणा दाम्पत्याने दोषमुक्तीची मागणी करताना केला होता. हे आरोपपत्र म्हणजे आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असा दावाही राणा दाम्पत्याने केला होता. पोलीसांनी पुरावा म्हणून सादर केलेल्या चित्रफितींमध्ये आपल्या घराबाहेर आणि खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी घातलेला गोंधळ दिसत आहे. शिवाय पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा मागे घेतली होती. त्यामुळे आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. आपण निर्दोष असून कोणाच्या तरी राजकीय फायद्यासाठी आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आले आहे, असा दावा राणा दाम्पत्याने अर्जात केला होता.
हेही वाचा >>>गोरेगाव मुलुंड प्रकल्पाचा खर्च ४७ कोटींनी वाढणार, उपयोगिता सेवा वाहिन्या हलवण्याच्या कामामुळे खर्च वाढला
दुसरीकडे, पोलिसांनी राणा दाम्पत्याने केलेल्या आरोपांचे खंडन करून त्यांच्या अर्जाला विरोध केला. ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण केली. प्रतिबंधक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी राणा दाम्पत्याने धक्काबुक्की केली, असा दावाही पोलिसांनी राणा दाम्पत्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्याची मागणी करताना केला.