मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि वेळेत होण्यासाठी, रेल्वे गाड्यांची गती वाढवण्यावर रेल्वे प्रशासन भर देत आहे. मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून गाड्यांचा वेग वाढवण्यात येत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या १२०६.७३ किमी रेल्वे मार्गावरून ताशी १३० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावण्यास सज्ज आहेत. येत्या काळात मुंबई विभागातील सीएसएमटी ते कसारा, कर्जत दरम्यान ताशी १३० वेगाने रेल्वेगाडी धावण्यास सज्ज होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागात ताशी १३० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई वगळता सर्व विभागांत रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्याची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मुंबई विभागात तांत्रिक, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे रेल्वेगाड्यांचा वेग ताशी १०५ किमी नेणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबई विभागात सुरक्षेच्या सर्व बाबी आणि तांत्रिक तपासणी करून, रेल्वे रुळांचे मजबुतीकरण, रेल्वेच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारणे किंवा मजबूत लोखंडी तारा लावणे, ओव्हर हेड वायर आणि सिग्नलिंग यंत्रणा सक्षम करणे अशी पायाभूत कामे केली जाणार आहेत.

हेही वाचा – मुंबई : कोट्यवधींच्या खजिन्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक

याबाबत हालचाली सुरू झाल्या असून हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा ताशी ११० किमी, पुणे विभाग ताशी १०५ ते ११० किमी , नागपूर विभाग ताशी ११० ते १२० किमी, सोलापूर विभाग ताशी १०५ ते ११० किमी आणि मुंबई विभाग ताशी १०५ किमी अशी वेगमर्यादा आहे.

हेही वाचा – “१४० कोटी घेतले अन् ३८ कोटींचे…”, ऑक्सिजन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

मुंबई विभागात वेगमर्यादा ताशी १३० किमी करण्याबाबत नियोजन नाही. भविष्यात याबाबत विचार केला जाऊ शकतो. डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

वर्धा – बडनेरा दरम्यान ९५.४४ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरून १५ रेल्वेगाड्यांचा वेग ताशी १३० किमी होणार आहे.