लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: गिरणी कामगारांसाठीच्या २५२१ घरांची रखडलेली सोडत आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाने दीड लाख गिरणी कामगारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. लवकरच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार अर्जदार कामगारांना आपल्या नावाबाबतची खात्री करून घेता येईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील प्रकल्पातील मे. टाटा हाऊसिंग कंपनी लिमिटेड, रांजनोळी, ठाणे येथील १२४४, श्री विनय अगरवाल शिलोटर, रायचूर, रायगड येथील १०१९ आणि मे. सांवो व्हिलेज, कोल्हे येथील २५८ अशी एकूण २५२१ घरे म्हाडाला गिरणी कामगारांच्या सोडतीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र यातील रांजनोळी येथील घरांची दुरवस्था झाली असून त्यांची दुरुस्ती केल्यानंतरच सोडत काढण्याची भूमिका गिरणी कामगार संघटनांनी घेतली आहे. पण म्हाडा आणि एमएमआरडीए अशा दोन्ही यंत्रणांनी दुरुस्तीची जबाबदारी टाळली आहे. त्यामुळे दुरुस्ती आणि पर्यायाने सोडत रखडली आहे. पण आता मात्र ही सोडत मार्गी लावण्याच्या हालचाली मंडळाने सुरु केल्या आहेत. त्यानुसार दीड लाख अर्जदारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. यासाठी येत्या काही दिवसातच वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा… “मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलोय की…”; BMC तील घोटाळ्यांप्रकरणी आदित्य ठाकरेंचे सरकारवर गंभीर आरोप
यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात सोडतीची तारीख आणि जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लवकरच गिरणी कामगारांसाठीच्या २५२१ घरांची सोडत निघेल असे सांगितले जात आहे. मात्र रांजनोळीतील घरांच्या सोडतीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. त्यामुळे सोडत कशी काढणार असा प्रश्न म्हाडातीलच काही अधिकाऱ्यांसह गिरणी कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा… संभाजी भिडे आमच्यासाठी गुरुजीच!; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समर्थन
बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील ३,८९४ घरांच्या २०२० च्या सोडतीतील पात्र विजेत्यांना घरांच्या चाव्या देण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार शुक्रवारी अंदाजे ३५० पात्र कामगारांना सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चावी वाटप केले जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी सोडतीची तारीख जाहिर करण्यात येईल. दरम्यान यापूर्वी २२ जुलै रोजी सोडत निघेल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र हा घोषणा हवेतच विरली.