मुंबई: राज्य सरकारने सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये यकृत प्रत्यारोपण विभाग सुरू करण्यास मंजुरी दिली असून या विभागासाठी चार कोटी ३० लाख २४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे सेंट जॉर्ज रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपम विभागाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या विभागाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या रुग्णालयामध्ये प्रत्यारोपण विभाग सुरू झाल्याने खासगी रुग्णालयांच्या तुलनेत स्वस्त दरामध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. त्यामुळे यकृत खराब झाल्याने त्रस्त असलेल्या रुग्णांना स्वस्तात यकृत प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा होणार आहे. हा विभाग सुरू करण्यााठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये हा विभाग सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने नुकतीच मान्यता दिली. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने हा विभाग सुरू करण्यासाठी चार कोटी ३० लाख २४ हजार ८४ रुपये निधी मंजूर केला. या विभागासाठी लागणारी औषधे आणि अन्य साहित्य खरेदी ही संस्थेस प्रतिवर्षी मंजूर होणाऱ्या निधीतून भागविण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा… महारेराच्या सुनावणीआधी सलोखा मंचाचा पर्याय यशस्वी; १३४३ प्रकरणात यशस्वी तडजोड!
राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीपैकी २ कोटी २८ लाख ७१ हजार ५०० रुपये यकृत प्रत्यारोपण विभागासाठी लागणारी उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच बांधकाम स्थापत्य खर्चासाठी १ कोटी ८० लाख २१ हजार ६३३ रुपये आणि बांधकाम विद्युत खर्चासाठी २१ लाख ३० हजार ९५१ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयातील इमारती पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने या विभागाच्या बांधकामासाठी पुरातत्व विभाग, महानगरपालिका व संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेण्याच्या सूचना करण्यात आली आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये यकृत प्रत्यारोपण विभाग सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ व्हावा यासाठी हा विभाग सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात येईल. – डॉ. विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय