मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास सुरुवात करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्ता, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पॉडटॅक्सी, कांजूरमार्ग कारशेडसह इतर कारशेडचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व कामे ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार आणि संबंधित सरकारी यंत्रणांकडून हालचालींना वेग देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील पहिल्या भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे- बीकेसी या पहिल्या टप्प्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे लोकार्पण आचारसंहितेपूर्वी, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबरोबरच राज्यातील ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पाच्या कामांनाही आचारसंहितेपूर्वी सुरुवात करून प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’तील सूत्रांनी दिली. त्यानुसार सुमारे ३० हजार कोटी रुपये खर्चाच्या पुणे वर्तुळाकार रस्त्यासह एमएसआरडीसीच्या अंदाजे १२ हजार कोटी रुपयांच्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला आहे.

पॉडटॅक्सी प्रकल्प कामाला सुरुवात

एमएसआरडीसीतील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करतानाच दुसरीकडे आचारसंहितेपूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्याची शक्यता आहे. वांद्रे- कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून वाहतुकीचा एक वेगवान पर्याय उपलब्ध करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पॉडटॅक्सी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. १०१६.३८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील सूत्रांनी दिली. आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यातच पॉडटॅक्सीचे भूमिपूजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मेट्रो कारशेडही मार्गी

●‘एमएमआरडीए’च्या पॉडटॅक्सी प्रकल्पासह मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाच्या तीन कारशेड प्रकल्पांचे कामही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

●अंदाजे ५५० कोटी रुपये खर्चाच्या कांजूरमार्ग कारशेडच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या कामाचा भूमिपूजन सोहळा झालेला नाही. त्यामुळे कांजूरमार्ग कारशेडचे औपचारिक भूमिपूजनही आचारसंहितेपूर्वी होण्याची शक्यता आहे.

●त्याच वेळी कशेळी आणि डोंगरी कारशेडच्या कामाचे कंत्राट अंतिम करण्यात आले असून या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक भूखंड ‘एमएमआरडीए’च्या ताब्यात आला आहे.

●त्यामुळे आता ५५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कशेळी कारशेडसह ६२६ कोटी रुपये खर्चाच्या डोंगरी कारशेडच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The state government plans to start work on ambitious projects in the state before the implementation of the code of conduct for assembly elections amy