मुंबई : वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकल फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांची सातत्याने आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महत्वाच्या स्थानकातील प्रवासी, प्रवासी संघटना यांच्याशी स्टेशन संवाद साधण्याचा सूचना आहे. स्टेशन मास्तरांना दिल्या आहेत. मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या आणखी दहा फेऱ्यांची भर १९ ऑगस्टपासून पडली.  त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ही ५६ वरुन ६६ झाली आहे.

हेही वाचा : Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

हेही वाचा : वरळीत ९५ हजार रुपये प्रति चौरस फूट अशा विक्रमी दराने घराची विक्री; १५१ कोटीत दोन सदनिकांची खरेदी

ठाणे ते सीएसएमटी ते ठाणे अप आणि डाउन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या चालवण्यात आल्या. सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात वातानुकूलित लोकल सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. बदलापूरमधील प्रवाशांनी रेल्वेच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. कळव्यातही प्रवाशांनी आंदोलन केले. प्रवाशांचा विरोध आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा पाहता सुरू केलेल्या दहा लोकल फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्याशिवाय मध्य रेल्वेला पर्याय राहिला नाही. हा विरोध मावळण्यासाठी आणि  वातानुकूलित लोकलला असलेला विरोध समजून घेण्यासाठी मध्य रेल्वेने स्थानिक प्रवासी, प्रवासी संघटना यांच्याशी स्टेशन मास्तरांमार्फत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या स्थानकातील स्टेशन मास्तरांना सूचनाही देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली. वातानुकूलित लोकल का गरजेची आहे, नेमका विरोध का होत आहे, प्रवाशांचे मत काय आहे हे जाणून घेणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : मुंबईतील टॅक्सी चालकांचा बेमुदत संपाचा इशारा, रिक्षा चालकांचाही संपाला पाठिंबा

प्रवाशांना म्हणणे मांडण्याची संधी

स्टेशन मास्तरांकडून बदलापूरमध्ये प्रवासी आणि प्रवासी संघटनाबरोबर सोमवारी १२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता बैठक होणार होती. ही बैठक आता येत्या बुधवारी होणार आहे. तसेच टिटवाळा, कल्याण, डोंबिवली,  ठाणे या स्थानकातही बैठका होणार आहेत.

वातानुकूलित लोकल चालवण्यास प्रवासी संघटनांचा विरोध नाही. मात्र सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून वातानुकूलित लोकल चालवू नये, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वातानुकूलित लोकल फेऱ्या पूर्णपणे नव्याने चालवण्यात याव्यात. यासंदर्भात आम्ही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशीही पत्रव्यवहार करणार आहोत. सोमवारी बदलापूर स्थानकात स्टेशन मास्तर आणि प्रवासी संघटनाची होणारी बैठक येत्या बुधवारी होणार आहे.

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था