मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळालेल्या यशाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे, मतदारांनी नाकारल्याने महायुती व त्यातही भाजपसाठी धोक्याचा इशारा मानला जातो. महाविकास आघाडीला १५० ते १६०च्या आसपास विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली आहे.
लोकसभेच्या ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. महायुतीला १७ जागांवरच समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून ४५ पारचा नारा महायुतीच्या नेत्यांकडून दिला जात होता. पण काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने महायुतीला चांगलाच दणका दिला. विदर्भ, मराठवाडा, मुंबईत महाविकास आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला. ३० जागा जिंकलेल्या महाविकास आघाडीने १६० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. महायुतीसाठी ही आकडेवारी नक्कीच धोक्याचा इशारा मानला जातो. लोकसभेच्या निकालाचा परिणाम पुढील पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहतो, असा आजवरचा अनुभव आहे. २००४ किंवा २००९ मध्ये राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले होते. २०१४ , २०१९ मध्ये मोदी लाटेत भाजपला लोकसभा निवडणुकीत राज्यात घवघवीत यश मिळाले होते.
हेही वाचा >>>अबकी बार…आघाडी सरकार! तिसऱ्या कार्यकाळात मोदींची मदार मित्रांवर
दोन्ही वेळेला विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते. हा कल यंदाही कायम राहिल्यास महाविकास आघाडीला चांगले यश मिळू शकते. अर्थात, भाजपचे नेते महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य सहजासहजी हातातून जाऊ देणार नाही. यासाठी पुढील चार महिन्यांत भाजपकडून लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी लोकानुय करणारे निर्णय घेतले जातील. महाविकास आघाडीतील ताकदवान नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले जातील. महाविकास आघाडीला विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईत चांगले यश मिळाले आहे. विदर्भात ६२, मराठवाडा ४८ तर मुंबईतील सहा अशा विधानसभेच्या ११६ जागा आहेत. विधानसभेसाठी महायुतीसाठी मोठे आव्हान असेल. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पार धुव्वा उडाला. भाजपला मित्र पक्षांवर अधिक अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर किल्ला लढवावा लागणार आहे.