मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत प्रथम वर्ष विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) प्रथम सत्राची परीक्षा सुरू आहे. मात्र या परीक्षेत त्रुटी तसेच गोंधळाची मालिका सुरूच आहे. ‘लेबर लॉ ॲण्ड इंडस्ट्रियल रिलेशन’ या विषयाची प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमाऐवजी जुन्या अभ्यासक्रमानुसार दिल्यानंतर ‘लॉ कॉन्ट्रॅक्ट ॲण्ड स्पेसिफिक रिलीफ’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नांच्या बाजूला देण्यात येणाऱ्या गुणांची बेरीज ही ७५ ऐवजी ३७ देण्यात आली, त्यामुळे शुक्रवारी विधी शाखेचे विद्यार्थी संभ्रमात पडून त्यांचा गोंधळ उडाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधी शाखेच्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा गोंधळ उडाल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून विद्यार्थी संघटनांकडूनही टीकेची झोड उठत आहे. मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत प्रथम वर्ष विधी शाखेची (तीन वर्षीय अभ्यासक्रम) प्रथम सत्राची ‘लॉ कॉन्ट्रॅक्ट ॲण्ड स्पेसिफिक रिलीफ’ या विषयाची परीक्षा शुक्रवार, १९ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात आली. ही परीक्षा ७५ : २५ या पॅटर्ननुसार घेण्यात आली, प्रश्नही ७५ गुणांचे होते. मात्र प्रश्नपत्रिकेवरील प्रश्नांच्या बाजूला देण्यात येणाऱ्या गुणांची बेरीज ही ७५ ऐवजी ३७ असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा सुरु होताच संभ्रमात पडले. विद्यार्थ्यांनी तत्काळ हा प्रकार परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर महाविद्यालयातील शिक्षकांनी मुंबई विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधून प्रश्नपत्रिकेतील चुकीबाबत सांगितले. त्यानंतर विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिकेतील एकूण ७५ गुणांनुसार सुधारित गुणांची विभागणी महाविद्यालयांना सांगण्यात आली.

हेही वाचा – मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

हेही वाचा – गोष्ट मुंबईची! भाग १४३ : समुद्रात भराव घालून उभे राहिले ‘हे’ रेल्वे स्थानक

“मुंबई विद्यापीठाने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना ७५ गुणांची परीक्षा असताना ३७ गुणांची बेरीज असलेली प्रश्नपत्रिका दिली, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मुंबई विद्यापीठ प्रशासन सातत्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळत आहे. चुका करणाऱ्या एकाही अधिकाऱ्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्यामुळे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. कुलगुरूंनी आता ठोस भूमिका घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा कारभार सुरळीत करावा”, असे मत शिंदे गटाच्या युवा सेनेचे उपसचिव ॲड. सचिन पवार यांनी व्यक्त केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sum of marks in the question paper of law branch is 37 instead of 75 the series of examination confusion continues by mumbai university mumbai print news ssb
Show comments