उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांची दिशा किंचितशी बदल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात एक-दोन अंशाने वाढ झाली असून किमान तापमान सरासरीवर आले आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. मात्र, गुरुवारपर्यंत कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून वर्षाखेरीस पुन्हा एकदा हुडहुडी भरणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान २६ अंश आणि किमान १४ अंशाच्या आसपास घसरण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मुंबईःअश्लील चित्रफीत दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार करणारा अटकेत

गेल्या शुक्रवारपासून मुंबईतील सांताक्रूझ येथील तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. यंदाच्या मोसमातील मुंबईतील सर्वाधिक किमान तापमान रविवारी नोंदवण्यात आले. रविवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १५ अंशावर, कुलाब्यात किमान तापमान १८.५ अंशापर्यंत खाली आले. शनिवारीच्या तुलनेत सांताक्रूझ येथील किमान तापमान १ अंशाने आणि कुलाबा येथील ०.३ अंशाने कमी झाल्याची नोंद झाली. तर, किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने कमी झाले. त्यामुळे रविवारी पारा १५ अंशांपर्यंत खाली आल्याने गारठा आणि दाट धुके वाढले होते. मात्र, सोमवारी पारा काही अंशाने वाढल्याची नोंद झाली. सोमवारी सांताक्रूझ आणि कुलाबा येथील किमान तापमान अनुक्रमे १६ आणि १९.२ अंश नोंदवण्यात आले. तर, मंगळवारीही सोमवारच्या तुलनेत किमान तापमानात सुमारे एक अंशाने वाढ झाली.

हेही वाचा- मुंबई : कुष्ठरोग रुग्णालयातील चर्चने कात टाकली;महानगरपालिकेने केला जीर्णोद्धार

मंगळवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान १७ अंश आणि कुलाबा येथील किमान तापमान २० अंश नोंदवले. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची दिशा किंचितशी बदलली असून सध्याच्या किमान तापमानात होणारी वाढ गुरुवारपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मात्र, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवेल. त्यानंतर पुन्हा शुक्रवारपासून तापमान कमी होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The temperature in mumbai has dropped the minimum temperature is likely to reach 14 degrees in the new year mumbai print news dpj