मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईमधील कमाल तापमानाचा पारा चढा असून पहाटे गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. गेले अनेक दिवस वातावरणात उष्मा जाणवत आहे. मात्र मुंबईमधील किमान, तसेच कमाल तापमानात गुरुवारपासून घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबई दुपारी कडक उन, तर पहाटे गारवा असतो. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रत २ अंशांनी अधिक तापमान नोंदले गेले. दोन्ही केंद्रावरील किमान तापमान बुधवारी अनुक्रमे २१.४ आणि २०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. नेहमीप्रमाणे किमान तापमान २ अंशांनी अधिक नोंदले गेले. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबईत दुपारी किंवा संध्याकाळी आकाश निरभ्र राहील, तसेच कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान तर, किमान तापमान हे १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षणाचा दुहेरी लाभ
हेही वाचा – मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात ग्वाही
उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पहाटे थंडी जाणवेल. तसेच पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहणार असल्यामुळे किमान, कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.