मुंबई : मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा अजूनही चढा आहे, पहाटे धुके दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. गुरुवारीही वातावरणात उष्मा जाणवत होता‌. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आणि शनिवारी दोन्ही दिवस तापमानात वाढ होणार आहे. पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसभर मुंबईत उकाडा जाणवतो, तर पहाटे धुके असते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३२.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवरील तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. दोन्ही केंद्रांवर गुरुवारी किमान तापमान अनुक्रमे २३.२ अंश सेल्सिअस आणि २३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दरम्यान, सध्या वाऱ्यांची दिशा दक्षिण आणि आग्नेयकडून आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. तापमानातील ही वाढ शनिवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे‌. या वाऱ्यांमुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. त्यामुळे थंडीचे दिवस असूनही मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा – अल्पवयीन मुलीचे चित्रीकरण करून खंडणीची मागणी; चार अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल

हेही वाचा – सुमारे पावणे दोन कोटींच्या फसवणूकीप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमानात काहीशी घट होईल. तसेच शुक्रवारी आकाश अंशतः निरभ्र राहील. दरम्यान, पुढील आठवड्यात पश्चिमी प्रकोपानंतर उत्तरेकडून वारे वाहू लागले तर पुन्हा गारवा जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The temperature in mumbai will increase mumbai print news ssb