मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवादी कारवायांसाठी अटक केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात काढलेल्या मोर्चात ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्ला हूँ अकबर’सारख्या घोषणा देण्यात आल्या. ही प्रवृत्ती सरकारने वेळीच ठेचली पाहिजे, अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे याबाबत गप्प का राहिले, पीएफआयविरोधात त्यांनी भूमिका का घेतली नाही, असा सवाल भाजपचे आशीष शेलार यांनी केला. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करणे, प्रशिक्षण देणे यामध्ये सहभागी असलेल्यांना एनआयएने अटक केली आहे. त्यांचे समर्थन करणाऱ्यांना यात धर्म व पाकिस्तान आठवत असेल, तर त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.