मुंबई: हॉटेलच्या वॅलेट पार्किंगमधील वाहन चालकाने मोटरगाडीतील दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आणण्यात बोरीवली येथील एमएचबी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करून त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार दर्शिल डोडिया (३४) हे माटुंगा किंग्स सर्कल परिसरातील रहिवासी आहेत. ते बोरीवली पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये १७ डिसेंबरला दुपारी गेले होते. त्यावेळी तेथे उभ्या केलेल्या मोटरीतून २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. हॉटेलमधून बाहेर आल्यावर हा प्रकार डोडिया यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा… गिरणी कामगारांसाठी ठाणे, कल्याणमध्ये १९ हजार घरांची निर्मिती होणार!

या गुन्ह्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर व पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील व त्यांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. यावेळी घटनास्थळावरील विविध १० ते १२ सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली असता हॉटेलच्या वॅलेट पार्किंगमधील चालक रमेश बंडू शिंदे (३३) याने डोडिया यांचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले. शिंदे याने पार्किंगच्या बहाण्याने डोडिया यांचे वाहन ताब्यात घेतले. काही अंतरावर तो वाहन उभे करताना दिसला व पुन्हा काही वेळातच तेथून संशयास्पद रितीने दुसरीकडे वाहन घेऊन गेला. काही वेळानंतर पुन्हा त्याच ठिकाणी वाहन आणून उभे केले. त्यामुळे वॅलेट पार्किंगच्या चालकावरील संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशीला सुरूवात केली. चौकशीत त्यानेच दागिने चोरल्याचे कबुल केले. त्यानुसार शिंदेला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीतील संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The theft of jewellry from a motor vehicle by a driver in the valet parking of a hotel the accused was arrested mumbai print news dvr