मुंबई : अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीत १३ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले असून अद्याप ५ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर येत्या काळात एटिकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाईल.मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील एकूण जवळपास १ लाख ४७ हजार जागा रिक्त होत्या आणि अर्ज केलेल्या जवळपास ४५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे बाकी होते. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या १ लाख ७ हजार २९८ जागांसाठी एकूण १८ हजार ७०३ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी १३ हजार ४ विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालय मिळाले. ८ हजार २२५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, १ हजार ७४८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ९८२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.
मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीच्या तुलनेत तिसऱ्या विशेष फेरीत २ ते ४ टक्क्यांनी घट झाली आहे. काही महाविद्यालयांच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये जवळपास ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.मुंबई महानगरक्षेत्रातील काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे संबंधित महाविद्यालयांची तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात आली नाही.पहिल्या नियमित प्रवेश फेरीपासून ते तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीपर्यंत अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पहायला मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाची चुरस ही प्रत्येक प्रवेश फेरीमध्ये वाढून विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. महाविद्यालय कधी सुरु होणार? याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>>बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण, आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल
हेही वाचा >>>मंत्रालयात आजपासून दररोज शिवरायांच्या विचारांचे स्मरण
पुढील प्रवेश प्रक्रिया कशी?
विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले आहे की नाही, हे पाहता येईल. तिसऱ्या विशेष प्रवेश यादीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवार, १० ऑगस्ट (सकाळी १० वाजल्यापासून) ते शनिवार, १२ ऑगस्ट (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. कोट्यांतर्गत व द्विलक्षी अभ्यासक्रमांचे प्रवेश याच कालावधीत होणार आहेत. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करून घ्यावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश फेरीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.