तिसऱ्या लाटेमध्ये बहुतांश महिला लक्षणेविरहित

शैलजा तिवले

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये इतर रुग्णांप्रमाणे गर्भवतींमध्येही संसर्गाचे स्वरूप सौम्य असल्याचे आढळले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुंबईत सहाशे गर्भवतींना करोनाची बाधा झाली होती. बहुतांश महिला लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे आढळले. करोनाची साथ सुरू झाली त्या वेळी गर्भवती जोखमीच्या गटात असल्याने त्यांना करोनाचा धोका अधिक असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार पालिकेने करोनाबाधित गर्भवतींना वेळेत उपचार देण्यासाठी नायर रुग्णालय हे प्रमुख करोना रुग्णालय म्हणून उपलब्ध केले होते. मुंबई महानगर प्रदेशात सेवा पुरेशा नसल्यामुळे तेथूनही अनेक महिला रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या.

पहिल्या लाटेमध्ये नायरमध्ये सुमारे अकराशेहून अधिक बाधित गर्भवतींवर उपचार करण्यात आले. या काळात ८३६ महिलांच्या प्रसूती केल्या गेल्या. यातील बहुतांश गर्भवती लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे होती. त्यामुळे या काळात मृत्युदर ०.७० टक्के होता. दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टामुळे करोना संसर्गाची तीव्रता जास्त होती. याचा परिणाम गर्भवतींवरही झाल्याचे आढळले होते. या काळात गर्भवतींमध्ये संसर्गाची तीव्रता १० ते १५ टक्के अधिक असल्याचे दिसून आले होते. परिणामी या काळात नायरमध्ये ४९६ गर्भवतींवर उपचार करण्यात आले. तर मृत्युदर जवळपास साडेपाच टक्क्यांवर गेला होता.

कामा रुग्णालयात पहिल्या लाटेमध्ये ७०० करोनाबाधित गर्भवतींवर उपचार केले गेले. परंतु प्राणवायू देण्याची गरज फारशी भासली नाही. दुसऱ्या लाटेत कामामध्ये ४०० जणी दाखल झाल्या होत्या यातील १२० जणींना प्राणवायू लावण्याची आवश्यकता भासली. दुसऱ्या लाटेमध्ये सात ते नऊ महिन्यांच्या गर्भवतींमध्ये तीव्र लक्षणे आढळली आहे. मृत्यू झालेल्या महिलांमध्येदेखील सहाव्या महिन्यानंतरच्या गर्भवतींची संख्या अधिक होती. नायरमध्ये आत्तापर्यंत १,३३२ बाधित गर्भवतींवर उपचार करण्यात आले. यातील ८३६ महिला पहिल्या लाटेत बाधित झाल्यामुळे दाखल झाल्या होत्या, तर दुसऱ्या लाटेमध्ये ४९६ महिलांना करोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. दोन्ही लाटांचा काळ अधिक होता. परंतु त्या तुलनेत साधारण एक ते दीड महिना सुरू असलेल्या या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक गर्भवती बाधित झाल्याचे आढळले आहे.

२१ डिसेंबर ते जानेवारी या काळात २०० करोनाबाधित महिलांची प्रसूती झाली आहे. यातील बहुतांश महिलांना सौम्य लक्षणे होती. त्यामुळे एकही मृत्यू झाल्याचे आढळलेले नाही, अशी माहिती नायर रुग्णालयाच्या साहाय्यक प्राध्यापक डॉ. सारिका पाटील यांनी दिली. रुग्णालयात सुमारे ३५० गर्भवतींना उपचार दिले असले तरी एकाही महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही. यातील ४० टक्के महिलांना सौम्य लक्षणे होती, अन्य महिला लक्षणेविरहित होत्या. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेच तिसरी लाट गर्भवती महिलांसाठी सौम्यच असल्याचे नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग प्रसूती विभागाचे नोडल अधिकारी डॉ. नीरज महाजन यांनी सांगितले.

केवळ दोन महिलांनाच प्राणवायू

कामामध्ये २१ डिसेंबरपासून आजपर्यंत मुंबईतील २५२ करोनाबाधित गर्भवती उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. यातील ९५ महिलांची प्रसूती करण्यात आली. यातील पाच टक्के महिलांना सौम्य लक्षणे होती, तर ९५ टक्के महिला या लक्षणेविरहित होत्या. केवळ दोन महिलांना प्राणवायूची आवश्यकता भासली आहे, तर एकाही महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे या वेळी गर्भवती महिलांना फारसा धोका नसल्याचे आढळले, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

Story img Loader