मुंबई: मुंबईतील वाढत्या प्रदुषणामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनेही उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत वाहतूक पोलिसांनी गेल्या ९ दिवसांत वायू प्रदुषणाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी ८,४४५ कारवाया केल्या आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत अनधिकृत सायलन्सरची निर्मिती करणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ यांनी दिली.
वाहतूक पोलीस पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांविरोधात ७ नोव्हेंबरपासून कारवाईला सुरूवात केली आहे. तसेच राडारोड्याची वाहतूक करताना नियमभंग करून धूळ उडवणाऱ्या वाहनांवरही कारवाई करणास सांगण्यात आले होते. जुन्या व्यावसायिक वाहनांना सीएनजी किट बनवणे बंधनकारक असतानाही अनेक वाहनचालक तसे करणे टाळतात. अशा वाहनावरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच दुचाकी, मोटरगाडीचा सायलन्सर कापलेल्या वाहनांवरही कारवाई करण्याचे आदेश सर्व चौक्यांना देण्यात आले होते.
या आदेशानंतर वाहतूक पोलिसांनी वायू प्रदुषणाबाबतच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी ८,४४५ कारवाया केल्या आहेत. त्यात पीयूसी प्रमाणपत्र नसल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी ५,८६६ कारवाया केल्या आहेत. वाहनांच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल केल्याप्रकरणी ८४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यावेळी ५८४ सायलेन्सर वाहतूक पोलिासंनी जप्त केले. त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात आले आहेत. राडारोडा अथवा मालाची धोकादायक वाहतूक केल्याप्रकरणी १,७३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेअंतर्गत १३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अनधिकृत सायलन्सर वायू व ध्वनी प्रदुषणाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा सायलन्सरची निर्मिती करणाऱ्यांविरोधातही पोलीस कारवाई करणार आहेत.
वायू प्रदुषबाबात ९ नोव्हेंबरला सर्वाधिक कारवाया
गेल्या ९ दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी वायू प्रदुषणाच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत ९ नोव्हेंबरला वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाया केल्या. गुरूवारी पीयूसी नसलेल्या १,०२८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. वर्षभरात पीयूसीबाबत २० हजार ९४६ कारवाया वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत. तसेच अनधिकृत सायलेन्सरबाबत २१६ कारवाया एका दिवसात करण्यात आल्या. याशिवाय राडारोड व मालाची असुरक्षीतरित्या वाहतूक केल्याप्रकरणी ३३१ वाहनांवर कारवाई करण्यात आली.